Mitchell Starc Sledges Harshit Rana: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटी सामन्यात तळाच्या फलंदाजीत मिचेल स्टार्कनं उपयुक्त खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात स्टार्क आणि भारतीय जलदगती गोलंदाज हर्षित राणा यांच्यात स्लेजिंगचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाला. हर्षित राणानं मारलेल्या बाऊन्सरनंतर ऑस्ट्रेलियन स्टार स्टार्क याने थेट हर्षितला धमकीच दिली. मैदानातील हा सीन कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
...अन् स्टार्कनं भारतीय गोलंदाज हर्षित राणाला दिली धमकी
पर्थ कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव १५० धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केले. दुसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं पाच विकेट्स हॉलचा टप्पा पूर्ण केला. दुसरीकडे पहिला सामना खेळणाऱ्या हर्षित राणानं आपली दुसरी विकेट घेत कांगारूंना नववा धक्का दिला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा याला जणून धमकीच दिल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं कधी अन् काय घडलं?
दुसऱ्या दिवसाच्या खेळातील ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३० व्या षटकात हर्षित राणा गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर हर्षित राणानं स्टार्कला उसळता चेंडू टाकला. हा चेंडू स्टार्कच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये उभा असलेल्या विराट कोहलीकडे गेला. हर्षित राणा पुन्हा गोलंदाजी मार्कवर जात असताना स्टार्क त्याला शाब्दिक माऱ्यानं डिवचताना दिसले. मी तुझ्यापेक्षा अधिक जलदगतीने गोलंदाजी करतो, असे सांगत त्याने जणून हर्षित राणाला धमकीच दिली. ही गोष्ट फार मनाला लावून न घेता हर्षित राणाने स्मित हास्य देत स्टार्कच्या अंदाजातच रिप्लाय दिला.
IPL मध्ये एकाच टीमकडून खेळताना दिसलीये ही जोडी
मिचेल स्टार्क हा आपल्या जलदगती गोलंदाजीतील उसळत्या चेंडूच्या माऱ्याने फलंदाजांना त्रस्त करून सोडत असतो. हर्षित राणाने त्याचा हा पॅटर्न त्याच्याविरुद्ध आजमावल्याचे पाहायला मिळाले. भेदक माऱ्यासह हर्षितनं स्टार्कला काही बाऊन्सर मारल्याचेही पाहायला मिळाले. ही दोघं आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून एकत्र खेळताना दिसली आहेत.