IND vs AUS : टीम इंडियानं पर्थच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेट केला खास विक्रम ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात सुरु आहे. पहिल्या डावात १५० धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघानं ४६ धावांची अल्प आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवलीये. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघ्या १०४ धावांत ऑल आउट करत खास विक्रमाला गवसणी ही घातली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघावर घरच्या मैदानात लाजिरवाण्या कामगिरीची नोंद झालीये. पर्थच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटाच्या जोरावर भारतीय संघानं नवा इतिहास रचला आहे.
७७ वर्षांपूर्वीची कामगिरी सुधारत टीम इंडियानं सेट केला नवा विक्रम
भारतीय संघाने कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाला सर्वात कमी धावांत आटोपल्याचे पाहायला मिळाले. १०४ ही ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची आतापर्यंतची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. याआधी १९४७ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १०७ धावांत आटोपला होता. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघावर शंभरी पार करणंही चॅलेंजिग वाटतं होते. पण स्टार्क आणि हेजलवूड यांनी अखेरच्या विकेट्ससाठी २५ धावांची भागीदारी केल्यामुळे त्यांनी शंभरी पार केली.
२००० नंतर ऑस्ट्रेलियाची कसोटीतील तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या
भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०४ धावा केल्या. यासह त्यांच्या नावे आणखी एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. २००० नंतर ऑस्ट्रेलियन संघाची कसोटीतील ही तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. याआधी २०१० मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ९८ धावांत आटोपला होता. २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघानं कांगारूंना ८५ धावांवर रोखले होते.
भारतीय संघानं तिसऱ्यांदा करून दाखवली अशी कामगिरी
भारतीय संघाने कमी धावा केल्यावर तिसऱ्यांदा कसोटी सामन्यात आघाडी घेण्याचा पराक्रम पर्थ कसोटी सामन्यात करून दाखवला. याआधी १९३६ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघाने पहिल्या डावात १४७ धावा केल्यावर १३ धावांची आघाडी मिळवली होती. याशिवाय २००२ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ९९ धावांवर ऑल आउट झाल्यावर टीम इंडियाने ५ धावांची अल्प आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले होते.