WTC Standings (Marathi News) : भारतीय संघामागे ऑस्ट्रेलियन्स संघ हात धुवून लागला आहे, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२१-२३ फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाकडून वन डे वर्ल्ड कप हिसकावला आणि त्यानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर १ स्थानही घेतले. आता ऑस्ट्रेलियाने आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ३-० अशी जिंकल्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा तर झाला आहेच, परंतु त्याचा फटका भारताला बसला आहे.
ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship 2023-25 ) स्पर्धेच्या तालिकेत अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ WTC जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. सिडनी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने ३-० अशा फरकाने पाकिस्तानचे नाक ठेचले. कालच ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी क्रमवारीत भारताकडून नंबर १ स्थान हिसकावले होते. आज जाहीर झालेल्या WTC च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय.
तिसऱ्या कसोटीत काय घडले?- मोहम्मद रिजवान ( ८८), आगा सलमान ( ५३) व आमेर जमाल ( ८२) यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या. - ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २९९ धावा करता आल्या. जमालने ६९ धावांत ६ विकेट्स घेतल्या.- १४ धावांची आघाडी मिळवूनही पाकिस्तानचा दुसरा डाव ११५ धावांवर गडगडला. सईम आयुब ( ३३) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जोश हेझलवूड ( ४-१६) व नॅथन लियॉन ( ३-३६) यांनी चांगली गोलंदाजी केली.- ऑस्ट्रेलियाने २५.५ षटकांत हा विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर व मार्नस लाबुशेन यांनी मॅच विनिंग अर्धशतक झळकावले.