ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अखेरचा सामना सिडनीच्या मैदानात खेळवण्यात आला. अखेरचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली. या मालिकेत दबदबा दाखवून देताना इंग्लंडच्या संघासमोबत मिळून ऑस्ट्रेलियाने जे याआधी कधीच घडलं नव्हतं ते करुन दाखवत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचेही पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं
यंदाच्या अॅशेस कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी मिळून ४ पेक्षा अधिकच्या धावगतीने धावा काढल्या. यापूर्वी कधीच चार किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी इतक्या वेगाने धावा झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलिया–इंग्लंड यांच्यात नेहमीच पाच सामन्यांची मालिका होते. याशिवाय भारत–ऑस्ट्रेलिया आणि भारत–इंग्लंड यांच्यातही चार ते पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवल्या जातात. पण याआधी कोणत्याही मालिकेत अशी कामगिरी नोंदवली गेली नव्हती.
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
टेस्ट क्रिकेटमधील जुने विक्रम मागे पडले
याआधी २०२३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एशेज मालिकेत दोन्ही संघांनी मिळून ३.९३ च्या धावगतीसह धावा केल्या होत्या. आता तो विक्रम मोडीत निघाला आहे. २०२५ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अँडरसन–तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी एकत्रितपणे ३.८६ च्या धावगतीने धावा केल्या होत्या. मात्र, यंदाच्या एशेज मालिकेत पहिल्यांदाच चार किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी ४ पेक्षा अधिक धावगतीने धावा केल्या.
पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत काय घडलं?
यंदाच्या अॅशेसम मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीपासून मजबूत दिसला. पहिल्या तीन सामन्यातील विजयासह त्यांनी मालिका एकतर्फी खिशात घातली. इंग्लंडच्या संघाने चौथ्या सामन्यात लाज राखली. या सामन्यातील विजय मिळवल्यावर पाचव्या सामन्यातही त्यांनी जोर लावला. पण शेवटी ऑस्ट्रेलियाने या मालिकेत विजयी चौकार मारला. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने जो रुटच्या १६० (२४२) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३८४ धावा केल्या होत्या. याला प्रत्युतर देताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅविस हेड १६३ (१६६) आणि स्टीव्ह स्मिथ १३८ (२२०) यांनी शतकी खेळी केली. या दोघांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ५६७ धावा करत १८३ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या संघाने जेकब बेथेल याने २६५ चेंडूत केलेल्या १५४ धावांच्या खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात ३४२ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर १६० धावांचे टार्गेट सेट केले होते. यजमान संघाने हे आव्हान ५ विकेट्स राखून पार केले.