Join us
Daily Top 2Weekly Top 5

AUS vs SA, WTC 2023: दक्षिण आफ्रिकेचा पराभव अन् भारताला 'लागली लॉटरी', टीम इंडियाची WTCच्या फायनलकडे कूच

AUS vs SA Live: सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:18 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. सोमवारपासून या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली. यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेतील पहिला सामना घेऊन विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात यजमान कांगारूच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत कांगारूच्या गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. कॅमेरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेच्या डावात 5 बळी घेऊन आफ्रिकेला मोठे धक्के दिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्या डावात 68.4 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या डावाची शानदार सुरूवात केली. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारतीय संघाचा फायदा झाला आहे. कारण अखेरच्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सहज पोहचेल. अलीकडेच पार पडलेल्या बांगलादेशविरूद्धच्या विजयामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मार्ग सोपा झाला आहे. खरं तर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी महत्त्वाची होती. या मालिकेपूर्वी 55.77 गुणांसह भारत WTC पॉइंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आजच्या विजयामुळे भारताने 58.93 गुण मिळवले असून आपले दुसरे स्थान मजबूत केले आहे. आताच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. भारत दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. 

असे आहे समीकरण 

  • जर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने हरवले तर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध फक्त कोणत्याही फरकाने विजय मिळवावा लागेल.
  • जर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक जरी सामना जिंकला आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 2-0 ने विजय मिळवला तर, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1, 3-0 किंवा 2-2 ने जिंकणे आवश्यक आहे. 

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 200 धावांची द्विशतकी खेळी केली. उस्मान ख्वाजा (1), मार्नस लाबूशेन (14), स्टीव्ह स्मिथ (85), ट्रेव्हिस हेड (51), कॅमेरून ग्रीन (नाबाद 51), ॲलेक्स कॅरी (111), पॅट कमिन्स (4) आणि नॅथन लायन (25) धावा करून बाद झाला. यजमान संघाकडून वॉर्नर, स्मिथ आणि कॅरी यांनी उल्लेखणीय खेळी केली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 8 बाद 575 धावा केल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे सलामीवीर वॉर्नरला द्विशतकी खेळीमुळे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. 

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय ऑस्ट्रेलियाच्या संघाने आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर उभारला ज्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाला घाम फुटला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची देखील सुरूवात निराशाजनक झाली. टेम्बा बवुमाने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. सारेल एरवी (21), डीन एल्गर (0), थेउनिस डे ब्रुन (28), टेम्बा बवुमा (65), खाया झोंडो (1), काइल व्हेरेने (33), मार्को जॅन्सन (5), केशव महाराज (13), कगिसो रबाडा (3), एनरिक नॉर्तजे (नाबाद 8), लुंगी एनगिडी (19) धावा करून तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात केवळ 204 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर आफ्रिकेचा संपूर्ण संघ गारद झाला. नॅथन लायनने सर्वाधिक 3 बळी पटकावले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला, तर स्कॉट बोलंडला 2 बळी घेण्यात यश आले. यासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. यजमान कांगारूच्या संघाने तब्बल 182 धावा आणि 1 डाव राखून मोठा विजय मिळवला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाआयसीसीबीसीसीआय
Open in App