ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका जिंकल्यावर टी-२० मालिकेत यजमानांना व्हाइट वॉश करण्याची स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तान संघाला दणका बसला आहे. कांगारूंनी सिडनीच्या मैदानातील दुसरा सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १४७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलवाग करताना पाकिस्तानचा संघ १३४ धावांत आटोपला.
चौघांच्या पदरी भोपळा; पाकवर दुसऱ्यांदा आली ही वेळ!
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात धावांचा पाठलाग करताना कॅप्टन मोहम्मद रिझवानसह बाबर आझमचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. एका डावात चार फलंदाजांच्या पदरी भोपळा आला. टी-२० क्रिकेटमध्ये २०१३ नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तान संघावर ही वेळ आली. याधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकचे चार फलंदाज एका डावात शून्यावर बाद झाले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीच्या मैदानातील सामन्यात पाकच्या नावे दुसऱ्यांदा या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
गोलंदाजीत पाकच्या हॅरिस राउफचा 'चौका'
पहिल्यांदा बॅटिंग करताना सलामीवीर मॅथ्यू शॉर्टनं १७ चेंडूत केलेली ३२ धावांची खेळी ही ऑस्ट्रेलियाकडून सर्वोच्च खेळी ठरली. त्याच्याशिवाय जेक फ्रेझर-मॅकगर्क २० (९), ग्लेन मॅक्सवेल २१ (२०), स्टॉयनिस १४ (१५). टीम डेविड १८ (१९) आणि एरॉन हार्डी २८ (२३) यांनी दुहेरी आकडा गाठला. दुसरीकडे पाकिस्तानकडून हॅरिस राउउ याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. अब्बास आफ्रिदी ३ आणि मुकीम याने २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
मॅचमध्ये पाकच्या ताफ्यातून आलं एकमेव अर्धशतक, पण ऑस्ट्रेलियानं सामन्यासह जिंकली मालिका
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवाननं केलेल्या १६ धावां शिवाय इरफान खान ३७ (२८) आणि उस्मान खान याने ३८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या तिघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे मॅचमध्ये एकमेव अर्धशतक आलं ते पाकिस्तानच्या ताफ्यातून पण मॅच आणि मालिका जिंकली ती ऑस्ट्रेलियानं. स्पेन्सर जॉन्सन याने भेदक मारा करत पाकचा अर्धा संघ एकट्यानं तंबूत धाडला. त्याच्याशिवाय झम्पानं २ तर झेवियर बार्टलेट याने एक विकेट घेतली.