Join us

ठरलं! टीम इंडिया कसोटी सामना खेळत असताना रोहित शर्मा मारणार एन्ट्री

एका बाजूला पहिल्या सामन्याची उत्सुकता असताना या मालिकेसाठी रोहित शर्मा टीम इंडियाला कधी जॉईन होणार हा मुद्दा देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:52 IST

Open in App

India vs Australia Test Series : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या चक्रातील महत्वपूर्ण अशा बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना हा पर्थच्या मैदानात रंगणार आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिकेत आघाडी मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. एका बाजूला पहिल्या सामन्याची उत्सुकता असताना या मालिकेसाठी रोहित शर्मा टीम इंडियाला कधी जॉईन होणार हा मुद्दा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. हे चित्रही जवळपास स्पष्ट झाले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना सुरु असतानाच रोहित शर्मा पर्थमध्येच संघाला जॉईन होणार आहे. 

कधी ऑस्ट्रेलियात पोहचणार रोहित?

क्रिकबझच्या वृत्तानुसार,  रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबरला संघासोबत असेल. दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे रोहित शर्मानं पत्नी रितिकासह फॅमिलीसोबत राहण्याला पसंती दिली होती. १५ नोव्हेंबरला रितिकानं बेबी बॉयला जन्म दिला होता. त्यानंतर आता रोहितनं बीसीसीयला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २४ नोव्हेंबरला संघाला जॉईन करेल, असे कळवल्याचा दावा क्रिकबझनं केला आहे. याचा अर्थ पुढील चार कसोटी सामन्यासाठी रोहितच संघाचा कॅप्टन असेल.

रोहित शर्मासंदर्भात काय म्हणाला होता बुमराह?

जसप्रीत बुमराहनं पर्थ कसोटी सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना रोहितसोबत संपर्कात असल्याची माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याआधी पर्थ कसोटीमध्ये कॅप्टन्सी करायची आहे, यासंदर्भात कोणतीही कल्पना नव्हती. इथं आल्यावरच पहिल्या कसोटी सामन्यासाठी कॅप्टन्सी करावी लागणार ते स्पष्ट झाले. एका बाजूला रोहितच्या अनुपस्थितीत बुमरावर कॅप्टन्सीची जबाबदारी असेल. दुसरीकडे डावाला सुरुवात करण्याची मोठी जबाबदारी ही लोकेश राहुलकडे देण्यात येणार आहे. लोकेश राहुलच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. प्रमोशन मिळाल्यावर त्याच्या भात्यातून मोठी खेळी येणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहलोकेश राहुल