अॅडिलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय संघावर पलटवार करत पर्थ कसोटीतील पराभवाचा हिशोब चुकता केला. या सामन्यातील विजयासह यजमान संघानं बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पराभवामागचं कारण सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियन संघ आमच्यापेक्षा भारी खेळला
भारतीय संघाच्या पराभवामागचं सर्वात मोठं कारण हे आघाडीच्या फलंदाजांनी केलेले अपयश हेच आहे. पण रोहित शर्मानं फलंदाजांचा बचाव करताना हा पराभव सांघिक आहे, अशा काहीशा तोऱ्यात सारवासारव केली. विजयासाठी ज्या पद्धतीने खेळायला पाहिजे होते तसे आम्ही खेळलो नाही. ऑस्ट्रेलियन संघ आमच्यापेक्षा भारी खेळला, असे तो म्हणाला आहे. पर्थप्रमाणेच इथंही आम्ही जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होते. पण प्रत्येक कसोटीत एक वेगळे आव्हान असते, असा उल्लेखही रोहित शर्मानं केला.
नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?
हा आठवडा आमच्यासाठी निराशजनक राहिला. आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. आम्हाला मॅचमध्ये काही संधी मिळाल्या. पण त्या संधीच सोन करता आलं नाही. त्याचीच किंमत आम्हाला मोजावी लागली. ऑस्ट्रेलियन संघ आमच्यापेक्षा भारी खेळ केला. जे चुकलं त्यात सुधारणा करून पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशी आहे, असे रोहित शर्मानं म्हटले आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने दिली होती विजयी सलामी
भारतीय संघाने पर्थ कसोटी सामन्यातून बॉर्डर गावसकर स्पर्धेला सुरुवात केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ बुमराहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला होता. या सामन्यातील पहिल्या डावात १५० धावांत आटोपल्यानंतरही भारतीय संघाने गोलंदाजांच्या जोरावर दमदार कमबॅक करत मोठ्या फरकाने सामना जिंकला होता. पण रोहित आला अन् पुन्हा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी घरच्या मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका गमावली होती. या पराभवानंतर त्याच्या कॅप्टन्सीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. एवढेच नाही तर टीम इंडियाच्या पराभवानंतर फलंदाजीतील त्याची उणीवही दिसून येत आहे.