Join us

IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...

कोहलीनं मार्नस लाबुशेनचा कॅच सोडला, त्यानंत बुमराह हॅटट्रिकवर पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:14 IST

Open in App

 पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव फक्त १५० धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पहिल्यांदा बॅटिंग निर्णय फसल्याचे चित्र निर्माण झाले असताना भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहनंच यात पुढाकार घेतला. आघाडीच्या तिघांना त्याने तंबूचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकल्याचे पाहायला मिळाले. 

यशस्वी रिव्ह्यूसह कॅप्टन बुमराहनं संघाला मिळवून दिलं पहिल यश 

भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह याने पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नॅथन मॅक्सवीनीच्या रुपात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. आपल्याच गोलंदाजीवर यशस्वी रिव्ह्यू घेत कॅप्टननं त्याला पायचित केले. मार्नस लाबुशेनलाही त्याने आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण विराट कोहलीनं त्याचा कॅच सोडला. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीतील धार कायम राखत हॅटट्रिकवर पोहचल्याचे पाहायला मिळाले.  

हॅटट्रिकवर पोहचलेला बुमराह, पण..

ऑस्ट्रेलियाच्या डावातील सातव्या षटकात जसप्रीत बुमराहनं सलामीवीर उस्मान ख्वाजाला आपल्या जाळ्यात अडकवले. लाबुशेने याचा  कॅच सोडणाऱ्या विराट कोहलीनंच स्लिपमध्ये ख्वाजाचा कॅच पकडला. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या स्टीव्ह स्मिथला बुमराहनं आल्या पावली माघारी धाडले. स्मिथवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. या विकेटसह जसप्रीत बुमराह हॅटट्रिकवर पोहचला होता. ट्रॅविस हेडलाही त्याने उत्तम चेंडू टाकला. तो पायचित होता होता वाचला अन् बुमराहची हॅटट्रिक हुकली. कॅप्टनचा हॅटट्रिकचा डाव हुकला असला तरी त्याने आपल्या भेदक माऱ्यानं ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्याचा डाव मात्र साधला आहे. 

बुमराहच्या खांद्यावर कॅप्टन्सीसह गोलंदाजीचं ओझं  

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह हा पर्थ कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कॅप्टन्सीसह त्याच्या खांद्यावर गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करण्याजे ओझे आहे. हे ओझ त्याने लिलया पेलल्याचे दिसून येत आहे. बुमराहच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजी कोलमडून पडली. कोहलीनं लाबुशेनेचा कॅच सोडला नसता तर ऑस्ट्रेलिया आणखी बिकट अवस्थेत असती. 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया