भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेनच्या मैदानात रंगलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील प्रत्येक सामन्यात ट्रॅविस हेड हा चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. तुफान फटकेबाजीशिवाय स्लेजिंगच्या खेळातही तो आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. सिराजसोबतचा त्याचा वाद अन् त्यानंतर दोघांच्यात दिसलेला गोडी गुलाबीचा सीन चांगलाच चर्चेत राहिला.
आकाशदीप-ट्रॅविस हेड यांच्यातील 'गंमत जंमत' सीन
पिंक बॉल टेस्टमधील ट्रॅविस हेड अन् सिराज यांच्यात रंगलेल्या स्लेजिंगच्या खेळामुळे दोघांवर कारवाईही झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा ट्रॅविस हेड अन् भारतीय संघातील गोलंदाज आकाशदीप यांच्यात फिल्डवर घडलेल्या 'गंमत जंमत' धाटणीतील सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. नो स्लेजिंग म्हणत खेळाडूंनी टेस्टमधील एक बेस्ट सीन क्रिएट केलाय, असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही. जाणून घेऊयात या सीनमागची गोष्ट
आकाशदीप अन् ट्रॅविस हेड यांच्यात फिल्डवर काय घडलं?
ब्रिस्बेन गाबा कसोटीतील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी डावाला सुरुवात केली. पॅट कमिन्सनं दुसरं षटक टाकण्यासाठी चेंडू नॅथन लायनकडे सोपवला. लायनच्या गोलंदाजीवर आकाशदीप स्ट्राइकवर होता. त्याने टाकलेला चेंडू आकाशदीपच्या पॅडमध्ये जाऊन बसला. हा चेंडू घेण्यासाठी शॉर्ट लेगवर फिल्डिंग करत असलेला ट्रॅविस हेड भारतीय बॅटरच्या दिशेने पुढे आला. तो चेंडू दे असा इशार करत असताना आकाशदीपनं त्याच्या हातात चेंडू न फेकता तो खाली जमीनीवर फेकला. आकाशदीपच्या कृतीनंतर ट्रॅविस हेडचा प्रतिक्रिया बघण्याजोगी झाली होती. पण यावर भारतीय बॅटरनं सॉरी सॉरी म्हणत माफीही मागितली. त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये कैदही झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय.
ट्रॅविस हेडनंच घेतली त्याची विकेट
संघावर फॉलोऑनच्या छायेत असताना आकाशदीपनं जसप्रीत बुमराहच्या साथीनं ३९ धावांची दमदार भागीदारी केली. त्याने ४४ चेंडूत २ टौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. जड्डूच्या रुपात भारतीय संघाला नववा धक्का बसल्यावर फॉलोऑन टाळण्यासाठी ३३ धावांची गरज असताना आकाशदीपनं संयमी खेळीकरत बुमराहच्या साथीनं टीम इंडियावरील मोठ संकट टाळलं. फॉलोऑन टळताच त्याने आपल्या भात्यातील मोठे फटकेबाजीचा नजराणाही पेश केला. पाचव्या आणि अखेरच्या दिवशीही मोठी फटकेबाजी करण्याच्या नादातच त्याने आपली विकेट गमावली. ट्रॅविस हेडच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याचा त्याचा डाव फसला अन् यष्टीमागे अशलेल्या कॅरीनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला.