टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वसीम जाफर हा रंजक पोस्टच्या माध्यमातून अनेकदा लक्षवेधून घेताना दिसते. आता बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या युवा सलामीवीरासाठी त्याने खास संदेश धाडला आहे. एक्स अकाउंटच्या माध्यमातून त्याने यशस्वी जैस्वालसाठी जो मेसेज शेअर केलाय त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटातील लोकप्रिय गाण्यातून दिला संदेश
वसीम जाफर याने बॉलिवूडमधील 'खलनायक' या लोकप्रिय चित्रपटातील प्रसिद्ध गाणं "चोली के पिछे क्या है.." या गाण्याच्या सुरुवातीची व्हिडिओ क्लीप शेअर केलीये. हा माझा यशस्वी जैस्वालसाठी खास मेसेज आहे, असा उल्लेख त्याने केल्याचे दिसून येते. 'खलनायक' गाण्यातून टीम इंडियासाठी नायक होण्यासाठी त्याने युवा बॅटरला एक हिंटच यातून दिल्याचे दिसते. त्याचा नेमका अर्थ लावणं तसं कठीण आहे. पण शेअर केलेल्या पोस्टमधील "कुकू कुकू.." या कोरसमध्ये जाफरला नेमकं काय सांगायचं ती गोष्ट दडलेली आहे, असे वाटतं.
त्या पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय?
यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा स्टार बॅटर आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याच्यावर संघाला मजबूत सुरुवात करुन देण्याची जबाबदारी पडलीये. ही जबाबादारी त्यान अॅलेस्टर कुकसारखी पार पाडावी, असा अर्थ जाफरनं शेअर केलेल्या पोस्टमधून निघतो. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कुक याने २००६ मध्ये पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. ज्यात त्याने शतकी खेळी केली होती. हेच कनेक्शन 'खलनायक' चित्रपटातील गाण्याच्या क्लिपशी जोडत जाफरनं युवा भारतीय बॅटरकडून तशाच खेळीची अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केल्याचे दिसते.
कुकचा दाखला देण्यामागचं कारण
यशस्वी जैस्वालसाठी बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा खूप खास आहे. कारण तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. याआधी यशस्वी जैस्वालनं भारतीय मैदानासह परदेशातील वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी सामना खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेत यशस्वीला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी ही दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच खेळाडूची उसळी चेंडूवर परीक्षा घेणारी असते. या खेळपट्टीवर यशस्वीनं कुकसारखी अप्रतिम कामगिरी करून दाखवत ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात धमाक्यात करावी, असा एक अर्थ जाफरच्या पोस्टमधून निघतो.