Join us

KL राहुलसाठी कॅप्टन रोहित मनाचा मोठेपणा दाखवणार? माजी क्रिकेटरनं केली 'मन की बात'

पर्थमधील राहुलची खेळी पाहिल्यावर रोहित आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 20:10 IST

Open in App

अ‍ॅडलेडच्या मैदानातील पिंक बॉल कसोटी सामन्यात लोकेश राहुल याला ओपनिंगची संधी मिळणं कठीण आहे. कारण नियमित सलामीवीर रोहित शर्मा यशस्वी जैस्वालसोबत डावाला सुरुवात करताना पाहायला मिळू शकते. एवढेच नाही तर शुबमन गिलमुळे तिसऱ्या क्रमांकावरही लोकेश राहुलसाठी जागा करता येणार नाही. या परिस्थितीत पुन्हा त्याच्यावर लोअर ऑर्डरमध्ये खेळण्याची वेळ येऊ शकते. पण रोहितनं मनाचा मोठेपणा दाखवला तर पिंक बॉल कसोटीतही केएल राहुलला ओपनिंगची संधी मिळू शकते. पर्थमधील केएल राहुलची खेळी पाहिल्यावर रोहित आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेणार का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. यावर माजी क्रिकेटरनं आपल्या मनातली गोष्ट सांगितली आहे. 

माजी क्रिकेटरला वाटतो की, रोहित शर्मानं  माघार घ्यावी

पर्थ कसोटी सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं डावाची सुरुवात करताना पहिल्या डावात २६ धावा तर दुसऱ्या डावात ७७ धावांची क्लास खेळी केली होती. त्यामुळेच दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित त्याला आपल्या जागी ओपनिंगची संधी देईल का? हा मुद्दा चर्चेत आहे. भारताचे माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या मुद्यावर आपल्या मनातली गोष्ट सांगितलीये. केएल राहुलसाठी कॅप्टन रोहित शर्मानं त्याग देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

हा निर्णय रोहितला स्वत: घ्यावा लागेल

ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये संजय मांजरेकर म्हणाला की, लोकेश राहुलचा फॉर्म पाहिल्यावर रोहित शर्मा आपल्याला सलामीला येण्याची गरज नाही, असा विचार करू शकतो. परिस्थितीनुसार, वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यासाठी अश्विन आणि जडेजाला ड्रॉप केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे लोकेश राहुलला ओपनिंगला कायम ठेवण्याचा पर्याय चुकीचा ठरणार नाही. पण याचा निर्णय खुद्द रोहितला घ्यावा लागेल. रोहित शर्मानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या दोन सामन्यात ६ व्या क्रमांकाला बॅटिंग करताना दोन शतके झळकावली होती, या आठवणीलाही मांजरेकर यांनी उजाळा दिला आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मालोकेश राहुल