Australia Announced Playing 11 For MCG Boxing Day Test Against India : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ दोन बदलासह उतरणार मैदानात
पिंक बॉल टेस्टनंतर संघातून आउट झालेला स्कॉट बोलँड याची पुन्हा एकदा संघात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे आणखी एक युवा बॅटर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाकडून पदार्पणासाठी सज्ज आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात सलामीवीर नॅथन मॅकस्विनी याने पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या जागी आता नवा चेहरा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहे. सॅम कॉन्स्टास हा मेलबर्नच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळताना दिसेल.
ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणा करण्याआधीच युवा बॅटरनं टीम इंडियाविरुद्ध झळकावलंय शतक
१९ वर्षीय सॅम कॉन्स्टास याने भारतीय संघाविरुद्धच्या कॅनबरा येथील प्रॅक्टिस मॅचमध्ये ९७ चेंडूत १०७ धावांची खेळी केली होती. मागील वर्षी रेड बॉल क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या या युवा ऑस्ट्रेलियन खेळाडूनं आतापर्यंत ११ सामन्यातील १८ डावात ४२.२३ च्या सरासरीनं ७१८ धावा केल्या आहेत. यात त्याने दोन शतकासह तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्यामुळे हेडसह आता टीम इंडियासाठी हे १९ वर्षांच पोरगंही डोकेदुखी ठरू शकतं.
ट्रॅविस हेडही फिट
ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर दुखापतीनं त्रस्त असणारा ट्रॅविस हेडही चौथ्या कसोटीसाठी फिट आहे. बॉक्सिंग डे कसोटी आधी त्याने सराव करून स्वत:चा फिटनेस सिद्ध करत ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा दिला. दुखापतीमुळे तो खेळणार नाही, अशी चर्चा रंगली होती. पण त्याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश दिसून येतो. या मालिकेत ट्रॅविस हेड कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. भारतीय संघासाठी तो डोकेदुखी ठरतोय, असे म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही.
बॉक्सिंग डे टेस्टसाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड