Join us

AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की, जिंकण्यासाठी?

दुसऱ्या डावात १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स डाव केला घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:58 IST

Open in App

Australia vs India, 3rd Test : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या आणि पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे. भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील १८५ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या ८९ धावांसह यजमान संघानं २७४ धावांची आघाडी घेतली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी जवळपास ५४ षटकांचा खेळ बाकी असून भारतीय संघ कोणत्या अप्रोचसह खेळणार ते पाहण्याजोगे असेल.

आघाडीच्या फळीतील फ्लॉपशोनंतर पॅट कमिन्सची फटकेबाजी 

दुसऱ्या डावात  ऑस्ट्रेलियन संघ जलद धावा करुन   टार्गेट सेट करण्याच्या इराद्यानंच मैदानात उतरल्याचे दिसते.  आघाडीच्या पाच फलंदाजांना दुहेरी आक़डाही गाठता आला नाही. ट्रॅविस हेडनं दुहेरी आकडा पार केला. पण तो यावेळी टीम इंडियासाठी काही डोकेदुखी ठरला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने संघाचे टार्गेट सेट करण्याचे इरादे स्पष्ट करणारी खेळी केली. १० चेंडूत त्याने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. ही ऑस्ट्रेलियन संघाकडून दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय एलेक्स कॅरीनं २० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या.  या दोघांशिवाय ट्रॅविस हेडनं १९ चेंडूत १७ धावांचं योगदान दिले. 

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स

जसप्रीत बुमराह या मालिकेत पहिल्यापासून कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या डावात ६ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघमोहम्मद सिराजआकाश दीप