Indian cricketer injured, IND vs AUS 4th Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामने खेळले गेले आहेत. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असून तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. आता मेलबर्नमध्ये या मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. पण शनिवारी, २१ डिसेंबर रोजी पहिल्या सराव सत्रात एक चिंता वाढवणारी गोष्टदेखील घडली. या मालिकेतील भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या केएल राहुलला दुखापत (KL Rahul Injury) झाली असून त्याच्या चौथ्या सामन्यातील समावेशावर साशंकता आहे.
राहुल चौथी कसोटी खेळणार नाही?
तिसरी कसोटी संपली. त्यानंतर एक दिवस विश्रांती घेऊन टीम इंडिया मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सरावासाठी पोहोचली. राहु फलंदाजीच्या सरावासाठी गेला. त्याच्या नेट सेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो फिजिओकडून उपचार घेताना दिसत आहे. चेंडू आदळल्यानंतर त्याच्या उजव्या हातावर स्प्रे लावला जात आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे समोर आलेले नाही. त्यामुळे तो बॉक्सिंग डे कसोटीसाठी मैदानात उतरेल की नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे दुखापत झाली असली तरी त्याला बरे होण्यासाठी ५ दिवसांचा अवधी आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ट्रेव्हिस हेडनंतर दुसऱ्या स्थानावर राहुल आहे. हेडने ८२ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत. तर राहुलने ४७ च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत, ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. या दोघांशिवाय भारतीय किंवा ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. यादीत तिसऱ्या स्थानी यशस्वी जैस्वाल (१९३) आणि नितीश कुमार रेड्डी (१७९) चौथ्या स्थानी आहे. राहुलने गेल्या दोन बॉक्सिंग डे कसोटीत शतके झळकावली आहेत. त्यामुळे दुखापतीमुळे तो बाहेर पडला तर भारतासाठी तो मोठा धक्का असेल.
Web Title: Aus vs Ind 4th Test at MCG indian cricketer KL Rahul injured right hand in net practice doubtful about 4th test inclusion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.