कराची - आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर खूपच निराश झाला आहे. मॅच संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने टीमच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानने अलगद हा सामना भारताकडे सोपवला. पाकिस्तानसाठी मोठी संधी होती, पण टीमने ती गमावली असं मोहम्मद आमिरने म्हटलं आहे.
थरथरत्या आवाजात आमिर म्हणाला...
या व्हिडिओत मोहम्मद आमिरचा आवाज कापत होता, त्याचे डोळे भावूक होते. त्यात वारंवार यावर भर देत होता की, टी-२० क्रिकेटमध्ये मोठा स्कोअर असला तरच त्याचा पाठलाग करणाऱ्या टीमवर दबाव येतो. आपण ही मॅच भारतासमोर प्लेटमध्ये ठेवली. ही खूप मोठी संधी होती, आपण जिंकू शकत होतो. इतका चांगला स्टार्ट मिळाला, ११-१२ षटकांत आपल्या ११३ धावा आणि १ विकेट होती. दोन्ही ओपनर्स सेट होते. त्यानंतर काय घडले ते कळलेच नाही. १४६ धावा टी-२० मध्ये डिफेन्ड करण्यासाठी पुरेशा नसतात असं त्याने सांगितले.
तसेच फायनलसारख्या मोठ्या सामन्यात आधी बॅटिंग करणे पाकिस्तानसाठी एक चांगली संधी होती. परंतु टीमने त्याचा फायदा उचलला नाही. पाकिस्तानी हा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी खूप उत्साहात होते. परंतु टीम इंडियाने दमदार बँटिंग आणि बॉलिंगमुळे भारत किती जास्त मजबूत आहे हे दाखवून दिले असंही मोहम्मद आमिर याने म्हटलं.
दरम्यान, क्रिकेट एक्सपर्टने आमिरचं विश्लेषण योग्य असल्याचं म्हटलं. पाकिस्तानी टीम ११३/१ या मजबूत स्थितीत होती, मात्र १४६ धावांवर ऑल आऊट झाली. भलेही भारताच्या सुरुवातीला २० धावांवर ३ विकेट पडल्या परंतु युवा फलंदाज तिलक वर्माने चांगली खेळी खेळली आणि भारताने हे टार्गेट सहजरित्या पूर्ण केले. आमिरने त्याच्या व्हिडिओतून टी-२० मध्ये आता १४०-१५० धावा ती वेळ नाही असं सांगत पाकिस्तानी फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.