Mohsin Naqvi Asia Cup Trophy Controversy Updates : टीम इंडियाने आशिया चषक २०२५च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा रोमांचक लढतीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहानच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने १४६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात सामना जिंकला आणि नवव्यांदा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पण विजयी झाल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. कारण पाकिस्तानी मंत्री व ACC अध्यक्ष मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी विजेतेपदाची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स स्वत:कडेच ठेवली. BCCIने नक्वींविरोधात ICC कडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे आता नक्वी भारतीय संघाला ट्रॉफी आणि मेडल्स देण्यास तयार झाले आहेत. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.
आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
मोहसीन नक्वी यांनी जेव्हा ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स स्वत:सोबत नेली, तेव्हा यावरून बराच गदारोळ झाला. नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही हे भारतीय संघाने आधीच सांगितले होते. त्यामुळे नक्वींऐवजी इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष खालिद अल झरूनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्याहस्ते ट्रॉफी आणि मेडल्स देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष या नात्याने नक्वी यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि स्वत:च ट्रॉफी देण्याचा हट्ट धरला. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी आणि मेडल्स स्वीकारण्यास नकार दिला. पण आता मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स भारतीय खेळाडूंना देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यासोबतच त्यांनी एक अट ठेवली आहे.
मोहसीन नक्वी यांची अट
क्रिकबझच्या वृत्तानुसार, मोहसीन नक्वी यांनी आता टीम इंडियाच्या खेळाडूंना ट्रॉफी आणि विजेत्यांची मेडल्स देण्याची तयारी दाखवली आहे. पण ट्रॉफी आणि मेडल्स देण्यासाठी एक औपचारिक सोहळा आयोजित करण्यात यावा आणि त्या सोहळ्यात नक्वी स्वत:च्या हस्ते भारतीय संघातील खेळाडूंना आणि कर्णधाराला मेडल्स व ट्रॉफी प्रदान करतील, अशी अट त्यांनी आयोजकांपुढे ठेवली आहे. सध्याची तणावाची परिस्थिती पाहता, असा औपचारिक सोहळा आयोजित होण्याची सध्यातरी कुठलीही चिन्हे नाहीत. त्यामुळे या नाट्यमय घडामोडी आणखी किती काळ सुरू राहणार, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
बीसीसीआयचा नक्वींना 'अल्टिमेटम'
टीम इंडियाने मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी घेतली आणि ते त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. मोहसिन नक्वींच्या वर्तनाविरुद्ध बीसीसीआय आता तक्रार करण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोहसीन नक्वी यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी दिली आहे. त्यांनी सांगितले की त्यांना आशा आहे की ते शक्य तितक्या लवकर आशिया कप ट्रॉफी भारतीय संघाला परत करतील. जर असे झाले नाही तर बीसीसीआय त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल. बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबई येथे होणाऱ्या आयसीसी परिषदेत याचा निषेध आणि तक्रार करू शकते. याचा अर्थ मोहसीन नक्वी यांना ऑक्टोबरपर्यंत ट्रॉफी भारतात परत करण्यासाठी वेळ आहे.