Sanju Samson Team India Playing XI Asia Cup 2025 : भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरून आल्यानंतर उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना यजमान युएईशी खेळणार आहे. या सामन्याआधी चाहते एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. तो प्रश्न म्हणजे, संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळेल की नाही? या स्पर्धेसाठी संघ जाहीर झाल्यापासून आणि शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून समाविष्ट केल्यापासून, या मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. तशातच या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी झालेल्या संघाच्या सराव सत्रातून संजू सॅमसनबद्दलचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सराव सत्रात सॅमसनसोबत काय घडले?
आशिया कपसाठी टीम इंडिया ४ सप्टेंबर रोजी दुबईला पोहोचली आणि तेव्हापासून टीम इंडिया सरावात व्यस्त आहे. सोमवारी, ८ सप्टेंबरला टीम इंडियाचे तिसरे सराव सत्र पार पडले आणि भारतीय संघाच्या फलंदाजांनी नेट्समध्ये ज्या क्रमाने सराव केला, तो संजू सॅमसन आणि त्याच्या चाहत्यांसाठी चांगले संकेत देणार नव्हता. रेव्हस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पहिल्या दीड तासात टीम इंडियासाठी सराव करणाऱ्या फलंदाजांमध्ये संजूचा समावेश नव्हता.
कुणी-कुणी केला सराव?
अहवालात म्हटले आहे की सुरुवातीला अभिषेक शर्मा, उपकर्णधार शुभमन गिल, तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी टीम इंडियाकडून फलंदाजी केली. याशिवाय जितेश शर्मा देखील फलंदाजीचा सराव करताना दिसला. दरम्यान, संजू सॅमसन विकेटकीपिंगचा सराव करण्यात व्यस्त दिसला. प्लेइंग-११ मध्ये विकेटकीपर-फलंदाज स्थानासाठी जितेश आणि संजूमध्ये स्पर्धा आहे आणि हे सराव सत्र संजूसाठी फारसे आशादायी नव्हते.
संजू सॅमसनचं काय होणार?
त्याच अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, सुमारे दीड तास फलंदाजीच्या सरावानंतर जितेश शर्माने विकेटकीपिंग ग्लोव्ह्ज चढवले आणि किपिंगचा सराव केला. या काळात संजू सॅमसनला फलंदाजीसाठी नेटवर जाण्याची संधी मिळाली आणि नंतर त्याने काही वेळ फलंदाजीचा सराव केला.
प्लेइंग ११ चा तिढा कायम?
आतापर्यंत टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनबाबत कोणतेही विधान किंवा दावा केलेला नाही, परंतु या एका सराव सत्रामुळे इतके संकेत मिळाले आहेत की संजूला या स्पर्धेत त्याच्या संधी वाट पहावी लागू शकते.