आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात म्हणजेच 'ग्रूप A' मध्ये आले आहेत. याच बरोबर ओमान आणि युएई देखील याच गटामध्ये आहेत. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत, चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा आहे, ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. यातच, या महा सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने चाहत्यांना आणि क्रिकेटपटूंना भावनिक आवाहन केले आहे.
जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना होतो, तेव्हा तेव्हा त्या सामन्याचा उत्साह शिगेला असतो. अगदी मैदानापासून ते लोकांच्या घरापर्यंत वेगळेच वातावरण असते. यासंदर्भातच, वसीम अक्र ने दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना आपल्या भावनांवर संयम ठेवण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
काय म्हणाला वसीम अक्रम? -टेलिकॉम एशिया स्पोर्ट्सशी बोलताना वसीम अक्रम म्हणाला, "मला विश्वास आहे की, भारत विरुद्ध पाकिस्तान साना इतर सामन्यांप्रमाणेच जबरदस्त असेल. तसेच, दोन्ही संघाचे खेळाडू आणि चाहतेही आपापल्या मर्यादेत राहतील." अकरमने हे भाष्य दोन्ही देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
अक्रम पुढे म्हणाला, "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जगभरातील कोट्यवधी लोक पाहतात. मला वाटते की खेळाडू आणि प्रेक्षकांनी सामन्यादरम्यान शिस्त दाखवावी." याच वेळी अक्रमने, भारतीय संघ सध्या मजबूत असल्याचे सांगत, जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे? -आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. स्पर्धेत दोन्ही संघ एकूण ३ वेळा समोरासमोर येऊ शकतात. एक सामना निश्चित आहे. जर दोन्हीसंघ सुपर 4 मध्ये पोहोचले तर दुसरा सामना होईल आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले तर तिसरा सामना होईल.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
पाकिस्तानचा संघ -सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.