IND vs PAK 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंका येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आगामी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक मोठे विधान केले आहे. आशिया चषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ तीनवेळा भिडू शकतात असे द्रविड यांनी म्हटले आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. साखळी फेरीतील सामने खेळल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा सुपर-४ मध्ये पाकिस्तानशी भिडण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे जर दोन्ही संघ सुपर-४ मध्ये विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश करू शकले तर चाहत्यांना तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळू शकतो.
बीसीसीआयने सोशल मीडियावर राहुल द्रविड यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि पाकिस्तानशी तीनवेळा खेळण्यासाठी आपल्याला सुपर-४ चा गज पार करावा लागेल. मला माहित आहे की आम्ही पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि नेपाळशी खेळणार आहोत, त्यामुळे आम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या दोन्हीही सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे", असे राहुल द्रविड यांनी सांगितले.
तसेच जर आम्हाला पाकिस्तानविरूद्ध तीनदा खेळण्याची संधी मिळाली तर ते खूपच विलक्षण असेल. याचा अर्थ आम्ही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू आणि पाकिस्तानही अंतिम फेरीत पोहोचेल अशी आशा आहे, असेही द्रविड यांनी नमूद केले.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल