Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास दोन दिवस राहिले आहे आणि तरीही भारतीय संघामागे लागलेले विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांनी दुखापतीमुळे आधीच आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना संघासोबत दुबईत जाता आले नाही. हे कमी होतं की काय, भारताला आणखी एक धक्का बसला आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी राखीव गोलंदाज म्हणून निवड झालेल्या दीपक चहरने ( Deepak Chahar) दुखापतीतून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार दीपक चहरला दुखापत झाली आहे आणि त्याच्याजागी २५ वर्षीय कुलदीप सेन याची निवड केली गेली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या कुलदीपचा राखीव खेळाडू म्हणूनच संघात समावेश केला गेला आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक स्पर्धा होणार आहे. श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
भारताच्या १५ सदस्यीय संघात भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग व आवेश खान हे तीन जलदगती गोलंदाज संघात आहेत. चहरने ६ महिन्यांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यातून पुनरागमन केले. आशिया चषक स्पर्धेत त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांचीही राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार कुलदीप सेनचे प्रशिक्षक अरिल अँथोनी यांनी सांगितले की, चहर या स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार आहे आणि कुलदीपची भारतीय संघात निवड झाली आहे.
![]()
कुलदीपचा भाऊ जगदीप सेन यानेही BCCIचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी २२ ऑगस्टला कॉल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी त्याला संघात निवड झाल्याचे सांगितले, आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने २० लाखांत कुलदीपला आपल्या ताफ्यात घेतले. त्याने ७ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या.