दुबईच्या मैदानात झालेल्या टी२० आशिया कप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने सलग ७ व्या विजयासह नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. दुबईच्या मैदानात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चारल्यावर टीम इंडियाने पाकिस्तानी मंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारण्यास नकार दिला. या गोष्टीसह टीम इंडियातील खेळाडूंनी ट्रॉफीशिवाय केलेल्या सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा रंगली. पाकिस्तानची जिरवल्यावर दुबईच्या मैदानात केलेल्या या भन्नाट सेलिब्रेशनची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यात आली त्याचा खुलासा वरुण चक्रवर्तीनं केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वरुण चक्रवर्तीनं शेअर केली खास गोष्ट
भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा मंगळवारी CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार मिळाल्यावर त्याने खास गप्पा गोष्टी करताना आशिया कप स्पर्धेतील जेतेपदानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागची खास गोष्ट शेअर केली आहे. या स्पर्धेत बहुतांश वेळा बाकावर बसलेल्या अर्शदीपनं संघातील खेळाडूंना ही आयडिया दिली अन् संघातील खेळाडूंनी त्याला फॉलो केले असा किस्सा वरुण चक्रवर्तीनं शेअर केला आहे.
Test Rankings: 'यॉर्कर किंग'चा बोलबाला! कसोटी क्रमवारीत बुमराह अव्वल, सिराजचीही मोठी झेप; TOP 10 मध्ये कोण?
नक्वींच्या आडमुठेपणामुळे ट्रॉफीशिवायच मायदेशी परतली टीम इंडिया
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या लढतीपासून पाकिस्तानी खेळाडूंपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. याच भूमिकेमुळे टीम इंडियातील खेळाडूंनी एकाही सामन्यात टॉस आधी किंवा मॅचनंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. फायनल जिंकल्यावर भारतीय संघाने आपली भूमिका ठाम ठेवली. ट्रॉफीसह आणि विजेत्या संघातील खेळाडूंना दिले जाणारे पदक नक्वी यांच्याऐवजी प्रेंझेटेशन सेरेमनीच्या वेळी उपस्थितीत अन्य सदस्यीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून द्यावे अशी विनंती केली. पण मोहसिन नक्वींनी यांनी आपला आडमुठेपणा दाखवला आणि भारतीय संघाला ट्रॉफीशिवायच मायदेशी परतावे लागले.
ट्रॉफीशिवाय हटके अंदाजात सेलिब्रेशन
भारतीय संघाचा कर्णधाराने ट्रॉफी स्विकारली नाही. पण सेलिब्रेशनमध्ये मात्र त्याची उणीव भासली नाही. प्रेझेंटेशन संपल्यावर भारतीय संघातील सर्व खेळाडू पोडियमवर जमले. सूर्यकुमार यादव हा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवेळी रोहित शर्मानं ज्या अंदाजात ट्रॉफी उंचावली त्या धाटणीत ट्रॉफी उंचावल्याचा अभिनय करत खेळाडूच्या ताफ्याकडे आला अन् सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. ही कल्पना अर्शदीप सिंगची होती, असा खुलासा वरुण चक्रवर्तीनं केला आहे.