Join us

ICC टीम इंडियासाठी काहीही जुगाड करायला तयार; दिग्गज क्रिकेटरने BCCI वरही केले गंभीर आरोप

कोण आहे तो माजी क्रिकेटर? कोणत्या मुद्यावरुन साधलाय निशाणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:06 IST

Open in App

पाकिस्तानच्या यजमानपदाखाली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं आपला दबदबा दाखवून दिला. दुबईच्या मैदानात न्यूझीलंडला शह देत भारतीय संघानं विक्रमी तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. पण अजूनही भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्यावरून काही तिखट प्रतिक्रिया येतच आहेत. वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी याआधीच दुबईच्या मैदानात खेळवल्यामुळे भारतीय संघाला फायदा होतोय, असा आरोप केला आहे. त्यात  आता आणखी एका कॅरेबियन दिग्गजाची भर पडलीये. 

फक्त अन् फक्त भारतीय क्रिकेट संघाच्या फायद्याच्या गोष्टी

अँड्री रॉबर्ड्स यांनी आता आयसीसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत भारतीय संघाला झुकते माप देण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केलीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) फक्त अन् फक्त भारतीय क्रिकेट संघाच्या फायद्याच्या गोष्टीवर भर देत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. रॉबर्ट्स यांनी मिड-डे ला दिलेल्या मुलाखतीत आयसीसीच्या कारभारावर राग व्यक्त केला. 

ताकदीचा गैरवापर होतोय

ते म्हणाले आहेत की, आता बदलाची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला सगळं भारतीय संघाच्या हित लक्षात घेऊन सर्व निर्णय घेतले जात आहेत. गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाला फायदा मिळाला होता. सेमी फायनल कोणत्या मैदानात रंगणार ते त्यांना आधीच माहिती होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं अजिबात प्रवास केला नाही. मोठ्या स्पर्धेत एखादा संघ प्रवास न करता कसा काय खेळू शकतो? असा प्रश्न  या दिग्गजाने  उपस्थितीत केलाय.  

पैसा येतोय म्हणून काहीही का? रॉबर्ड्स यांचा आयसीसीसह बीसीसीयवर निशाणा

ते पुढे म्हणाले आहेत की,  आयसीसी म्हणजे 'इंडियन क्रिकेट बोर्ड' असं समीकरण झालं आहे. भारत जे ठरवेल तेच होते. जर उद्या भारतीय संघाला वाटलं की, नो बॉल आणि वाइड बॉल नको, तर  त्यावरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद काहीतरी तोडगा काढेल. जे काही सुरुये ते निपक्षपाती नाही. भारतातून पैसा येतोय ही गोष्ट मान्य पण क्रिकेट हा खेळ एका देशाचा व्हायला नको. सर्वांसाठी समान नियम हवा, असे मत व्यक्त करत रॉबर्ड्स यांनी बीसीसीआय आणि आयसीसीवर निशाणा साधला आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसीरोहित शर्मा