भारतीय क्रिकेट टीमनं रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवून आशिषा चषक भारताच्या नावावर केला आहे. विजयानंतर भारतीय टीमने आशिया क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे विजयी जल्लोषात हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यातच आता भारतीय टी-२० टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आशिया कप मालिकेतील सर्व मॅचची फी भारतीय सैन्य आणि पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाला देणार असल्याचं जाहीर केले आहे.
पाकिस्तानला चीतपट केल्यानंतर सूर्यकुमार यादव याने म्हटलं की, मी वैयक्तिक या मालिकेतील सर्व सामन्याची फी भारतीय सैन्य आणि पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाला देणार आहे. आमच्या टीमने मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. आम्हाला कुणी बोलावले नाही. पण स्पर्धा जिंकणारा संघ ट्रॉफीला पात्र आहे असं मला वाटते. मी इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय, पाहत आलोय परंतु एका चॅम्पियन टीमला ट्रॉफी दिली जात नाही हे पहिल्यांदा पाहतोय. संघर्षाने आम्ही ही ट्रॉफी मिळवली आहे. हे सोपे नव्हते. आम्ही सलग २ दिवस सामने खेळत होतो. त्यामुळे आम्ही निश्चित त्यासाठी पात्र आहोत. यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही असं त्याने सांगितले.
टीम इंडियाच्या विजयानंतर काय घडले?
पाकिस्तानला हरवल्यानंतर मैदानात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली. सामना संपल्यावर जवळपास १ तासाने अवॉर्ड सेरेमनी सुरू झाली. त्यावेळी भारतीय संघाने ना ट्रॉफी घेतली, ना मेडल घेतले. मोहसिन नकवी यांच्याकडून आशिया चॅम्पियन ट्रॉफी स्वीकारणार नाही अशी भूमिका भारतीय टीमने घेतली. भारतीय टीम प्रशासनाने एसीसी आयोजकांना विजयी ट्रॉफी कोण देणार असं विचारले होते. त्यावर एसीसीने अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर जेव्हा नकवी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांच्या हातून भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला, त्यावेळी नकवी तिथेच उभे होते. त्यानंतर आयोजकांमधील एका सदस्याने गुपचूप तिथून ट्रॉफी हटवली.
दरम्यान, भारताच्या विजयानंतर BCCI ने निवेदन जारी केले. भारतीय संघाला २१ कोटी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भारतीय टीमची आशिया चषक मालिकेत चांगली कामगिरी राहिली. सुपर ४ आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवल्याबद्दल त्यांनी भारतीय टीमचं कौतुक केले. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. आपल्या सशस्त्र बलांनीही तेच केले होते. आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली असं बीसीसीआयने म्हटलं. भारतीय क्रिकेट टीमने सर्वाधिक ९ वेळा आशिया कप जिंकला आहे. ज्यात १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८, २०२३, २०२५ या वर्षी भारताने हा खिताब जिंकला आहे.