ACC Mens Asia Cup Rising Stars 2025, Bangladesh A vs India A, 1st Semi-Final : सलामीवीर हबीबुर रहमान सोहानच्या अर्धशतकी खेळीसह एसएम मेहरोब हसन याने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेश 'अ' संघाने पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत 'अ' संघासमोर १९५ धावांचे टार्गेट सेट केले आहे. रायझिंग स्टार टी-२० आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमधील लढत वेस्ट एन्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. मेहरोब हसन याने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली. त्याच्या दमदार खेळीच्या बांगलादेशच्या संघाने अखेरच्या १२ चेंडूत ५० धावा करत निर्धारित २० षटकात धावफलकावर ६ बाद १९४ धावा लावल्या. फायनल गाठण्यासाठी आता वैभव सूर्यवंशी मोठा धमाका करणार का? याकडे सर्वांच्या नजरा असतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एसएम मेहरोब हसनची तुफान फटकेबाजी
पहिल्या सेमीफायनलच्या लढतीत भारतीय संघाचा कर्णधार जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर हबीबुर रहमान सोहान याने ४६ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने बांगलादेशच्या संघाकडून ६५ धावांची सर्वाच्च धावंसख्या केली. गुरुप्रीत सिंगनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. अखेरच्या षटकात एसएम मेहरोब हसन याने १८ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकातील मोठ्या फटकेबाजीमुळे बांगलादेशच्या संघाने भारतीय संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे.
विजयकुमार वैशाक ठरला सर्वात महागडा गोलंदाज
गोलंदाजीत भारतीय संघाकडून विजयकुमार वैशाक याने ४ षटकात ५१ धावा खर्च केल्या. एकही विकेट न घेता तो सर्वात महागडा गोलंदाज ठला. गुरुप्रीत सिंग याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. याशिवाय हर्ष दुबे, सूयश शर्मा, रमनदीप आणि नमन धीर यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली. अखेरच्या २२ चेंडूत मेहेरोब याने यासिर अलीच्या साथीनं २२ चेंडूत ६४ धावांची भागीदारी रचली.