Abhishek Sharma, ICC T20 Rankings : टीम इंडियाचा तडाखेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा याने गेल्या काही दिवसांत केलेल्या तुफान फलंदाजीने त्याला एक चांगली बातमी मिळाली. आयसीसीच्या ताज्या टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माने मोठी उडी मारून थेट दुसरा क्रमांक पटकावला. गेल्या आठवड्यापर्यंत अभिषेक शर्मा टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत ४०व्या क्रमांकावर होता. पण इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत त्याच्या तुफान खेळीमुळे त्याने तब्बल ३८ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले. आयसीसीच्या ताज्या टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माने अनेक दिग्गजांना मागे टाकले. अभिषेक शर्माने फिल साल्ट, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोस बटलर, बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांसारख्या बड्या खेळाडूंना मागे सोडत आपले सर्वोत्तम रँकिंग कमावले.
इंग्लंड विरूद्धच्या मालिकेमुळे मोठी उडी
अभिषेक शर्माने इंग्लंड विरूद्धच्या टी२० मालिकेत पाच सामने खेळले. पाच सामन्यांच्या या मालिकेत अभिषेक शर्माने ५५.८० च्या सरासरीने २७९ धावा केल्या. मालिकेत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले. तसेच, पाच सामन्यात त्याने २२ षटकार आणि २४ चौकार ठोकले. ताज्या क्रमवारीनुसार, अभिषेक शर्माचे रेटिंग पॉइंट्स ८२९ झाले आहेत. आता अभिषेक शर्माच्या पुढे केवळ अव्वल स्थानी विराजमान असलेला ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड आहे. त्याचे ८५५ रेटिंग पॉइंट्स आहेत. मालिकेतील दुसऱ्या टी२० मध्ये अभिषेक शर्मा फ्लॉप ठरला. त्या डावातही त्याने दमदार खेळी केली असती तर तो क्रमवारीत अव्वल देखील ठरू शकला असता.
टॉप-१० मध्ये मोठी घसरगुंडी
दरम्यान, फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत हेडने आपली जागा कायम ठेवली आहे तर अभिषेक शर्माने मोठी झेप घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. हे दोघे वगळता इतर सर्वच खेळाडूंची क्रमवारीत घसरण झाली आहे. तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, फिल सॉल्ट, जोस बटलर, बाबर आझम, निस्सांका, मोहम्मद रिझवान आणि कुसल परेरा हे सर्वजण प्रत्येकी एक स्थानाने घसरून अनुक्रमे ३ ते १०व्या स्थानी आले आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर कायम आहे. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.