टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी तिलक वर्मा अनफिट ठरला तर बदली खेळाडूच्या रुपात टीम इंडियाच्या संघात श्रेयस अय्यर याला स्थान मिळायला हवे, असे मत माजी क्रिकेटर आणि समालोचकाच्या रुपात लोकप्रिय असलेल्या आकाश चोप्रा यांनी मांडले आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघाला तिलक वर्माच्या रुपात धक्का बसला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्माच्या जागी कोण?
टी-२० संघातील मॅच विनर फलंदाजाची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यादरम्यान अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परिणामी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. उर्वरित दोन सामन्यात तो खेळणार का? ते फिटनेसवर अवलंबून असेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे जर तो फिट झाला नाही तर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची जागा कोण घेणार? हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. यासंदर्भात माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी आपले मत मांडले आहे.
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
श्रेयस अय्यरसंदर्भात आकाश'वाणी'
आकाश चोप्रा यांनी एक्स अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी तिलक वर्माच्या जागी कोण सर्वोत्तम पर्याय आहे त्यावर आपले मत मांडले. ते म्हणाले आहेत की, टी-२० आशिया कप स्पर्धेच्या वेळी श्रेयस अय्यरला संघातून वगळणं आधीच अन्यायकारक वाटलं होतं. त्यामुळे आता संधी उपलब्ध असल्यास त्याला संघात घ्यायलाच हवं. जर तिलक वर्मा अनफिट असेल तर ‘सरपंच साब’ अर्थात श्रेयस अय्यरची आपोआप निवड व्हायला हवी. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि विजय हजारे ट्रॉफीतही धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही त्याने धुमाकूळ घातला होता. मध्यफळीत तोच सर्वोत्तम पर्याय ठरतो, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे.
अय्यरटी T20I क्रिकेटमधील कामगिरी
श्रेयस अय्यर हा टीम इंडियाच्या वनडे संघाचा भाग आहे. पण टी-२० संघात त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दित आहे. अय्यरने डिसेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे. आतापर्यंत त्याने या फॉरमॅटमध्ये ५ सामन्यात १३६.१२ च्या स्ट्राईक रेटनं ११०४ धावा केल्या आहेत.
गिल-ऋतुराज चांगले खेळाडू आहेत, पण...
तिलक वर्माच्या बदली खेळाडूच्या रुपात शुभमन गिलशिवाय यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि ऋतुराज गायकवाड यांची नावेही चर्चेत आहेत. पण या सर्वांपेक्षा श्रेयस अय्यरला पहिली पसंती द्यायला हवी, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. भारतीय संघाला मध्यफळीतील फलंदाज हवा आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाडपेक्षा तो सर्वोत्तम पर्याय ठरेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.