जोहान्सबर्गच्या दी वाँडरर्स स्डेडियमवर रंगलेला चौथा आणि अखेरचा सामना जिंकत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ३-१ अशी एकदम धमाक्यात जिंकलीये. रेकॉर्ड ब्रेकिंग मॅचमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी केलेल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित २० षटकात एका विकेटच्या मोबदल्यात २८३ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीतील अवस्थाही बॉलिंगप्रमाणेच एकदम बिकट झाली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १४८ धावांत आटोपला.
भारतीय संघाचा या वर्षातील हा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होता. या सामन्यातील विक्रमी कामगिरीसह भारतीय संघानं वर्ष अविस्मरणीय केलं आहे. एका बाजूला टीम इंडियानं या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले. एवढेच नाही तर या वर्षात टीम इंडियानं एकही टी-२० मालिका गमावली नाही. २६ टी-२० सामन्यात टीम इंडियाने २४ सामने जिंकले.
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १० धावांवर गमावल्या आघाडीच्या ४ विकेट्स
भारतीय संघाने परदेशी मैदानात उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. अर्शदिप सिंगनं पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला तंबूतचा रस्ता दाखवला. त्याला खातेही उघडता आले नाही. दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं दुसरा सलामीवर रायन रिकल्टन याला चालते केले. तिसऱ्या षटकात पुन्हा अर्शदीप आला अन् या षटकात मार्करम चालता झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हेन्रिक क्लासेन यालाही अर्शदीपनं खाते उघडू दिले नाही. तिसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १० धावांत ४ विकेट्स गमावल्या अन् इथंच मॅच टीम इंडियाच्या बाजूनं सेट झाली.
चौघांनी निराश केल्यावर दक्षिण आफ्रिकेकडून या चौघांनी गाठला दुहेरी आकडा
भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आघाडीचे चार गडी अगदी स्वस्तात माघारी फिरल्यावर दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सनं २९ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय डेविड मिलर याने २७ चेंडूत ३६ धावा केल्या. मार्को यान्सेन यानं २ चौकार आणि ३ षटकारांसह १२ चेंडूत केलेल्या २९ धावा आणि कोएत्झच्या ८ चेंडूतील १२ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं कसा बसा १४८ धावांचा आकडा गाठला आहे.
अर्शदीप सिंगनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स; रमनदीपनंही पटकावली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट
गोलंदाजीत भारतीय संघाकडून अर्शदीप सिंगनं पुन्हा एकदा आपल्या स्विंगची जादू दाखवून दिली. त्याने ३ षटकात २० धावा खर्च करत संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी फिरकीतील जादू दाखवून देताना प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय रवी बिश्नोई, हार्दिक पांड्या आणि रमनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.