- सुकृत करंदीकर 
सन 2019 चा जुलै महिना. 10 जुलैचा इंग्लंडमधला ढगाळ दिवस. पावसाची कंटाळवाणी भुरभुर होती. त्यात बोचऱ्या थंडीचा कडाकाही होता. तसल्या त्या 'टिपिकल इंग्लिश वेदर'मध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवरचं वातावरण मात्र तापलं होतं. वन डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी न्यूझीलंडवर मात करावी लागणार होती. धावांचा पाठलाग करताना स्थिती बिकट झाली होती.  'एमएसडी' खेळपट्टीवर होता, पण त्याच्या हालचालीतून, देहबोलीतून जाणवत होतं की तो हरलाय. भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसींग रुम शेजारी बसून मी सामना पाहात होतो. माझा आवडता, झुंजारराव महेंद्रसिंग धोनी खरं तर ओल्ड ट्रॅफर्डवरच संपला होता. आज फक्त त्यानं ते जाहीर केलं. आपला स्वतःचा डाव आटोपल्याची खोल जाणीव घेऊनच धोनी पॅव्हेलियनमध्ये परतत असल्याचं मी अगदी जवळून पाहिलं होतं. सहसा न बोलणाऱ्या त्याच्या चेहऱ्यानं  मला हेच सांगितलं होतं. तेव्हा मी हे लिहिलं तेव्हा काहींना त्याचा राग आला. पण हेच वास्तव होतं. धोनी त्याच्या आयुष्यातला शेवटचा सामना खेळला होता. 

यंदाची 'आयपीएल' गाजवून ऑस्ट्रेलियात होणार्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठीच्या संघात स्थान मिळवायचं आणि दिमाखात निवृत्त व्हायचं हा अंतिम पर्याय धोनीपुढं होता. पण कोरोनानं हे गणित जुळू दिलं नाही. संघात आला तेव्हाही त्याची फारशी दखल कोणी घेतली नव्हती. कारण पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. आज अलविदा केलं तेव्हाही तो मैदानात नाही. पण या प्रवासात त्यानं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारतीय संघाला पहिला क्रमांक मिळवून दिला. असा कर्णधार होणे नाही. असा जिद्दी फलंदाज होणे नाही.
 
'फिनिशर'चा 'एन्ड' !
ज्या धडाकेबाज, धाडसी आणि अविश्वसनीय रणनितीनं भारताला आजवर अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले, करोडो क्रिकेटप्रेमींना न विसरता येणारा आनंद दिला...तीच रणनिती आज हरली. कधी ना कधी हे होणार होतंच. या अस्ताला वर्ल्डकपचा मुहूर्त मिळाला, हे भारतीय क्रिकेट संघाचं दुर्दैव. 'फिनिशर एमएसडी धोनी' ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात आज संपला. यशासारखं दुसरं काहीच नसतं आणि अपयशाइतकं कड़ूही काही नसतं.

रवींद्र जडेजानं एका बाजूनं हरलेला सामना जिंकण्याची उमेद निर्माण केलेली असताना दुसऱ्या बाजूला धोनी शांत उभा होता. आजवर नेहमी त्याला असंच बघायची सवय आहे. कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच न्यायची आणि मग हुकमी, ताकदी फटके चौफेर लगावत विजय साजरा करायचा, ही सवय महेंद्रसिंग धोनीनेच चाहत्यांना लावली होती. आजही त्याची पुनरावृत्ती होणार, अशी आशा त्यामुळंच जिवंत होती. प्रत्यक्ष मैदानात मात्र वेगळं घडत होतं. विजयासाठी आवश्यक धावगती 8 च्या पुढं गेल्यानंतर धोनीला आव्हान किती कठीण आहे, याची जाणीव झाली होती. पण त्याचा नेहमीचा सूर त्याला गवसत नव्हता. धोनीला आज चेंडूला सीमापार करणं शक्यच होत नव्हतं. त्यामुळं जमेल तेव्हा धाव घेत दुसऱ्या एंडला थांबणं तो पसंत करत होता. जीवापाड धावून एकाच्या दोन धावा गोळा करत होता. समोरून 'सर' जडेजाने चौकार-षटकरांची माळ लावल्याने धोनीवरचा ताण कमी होत होता. पण जडेजा बाद झाल्यानंतर स्वतः धोनीला आक्रमक होणं भाग होतं. एक षटकार खेचत त्यानं प्रयत्न केला. पण तोवर खूप उशीर झाला होता. 

प्रतिस्पर्ध्याच्या हातातला विजय हिसकावून आणणारा धोनीचा 'मिडास स्पर्श' त्याच्या वाढत्या वयानं हिरावून घेतला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मधल्या फळीवर जेव्हा-जेव्हा जबाबदारी येऊन पडली तेव्हा ही फळी ओझ्याखाली दबून गेली. धोनी अपयशी ठरत असताना त्याची जागा घेणारंही कोणी दृष्टीक्षेपात येत नाही. रोहित-विराट पुढं सरसावल्यानं वीरू-सचिनची निवृत्ती एकदिवसीय संघाला कधी जाणवली नाही. धोनीचं विझणं अंधार वाढवणारं आहे. ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन यांच्यातलं कोणीच धोनीच्या जवळपासही नाही. 

स्वतः धोनीनं सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण, कुंबळे, सेहवाग, हरभजन या सारख्या अनेक महान खेळाडूंचा अस्त जवळून पाहिला आहे. यातल्या काहींचा अकाली अस्त धोनीनंच घडवून आणला असाही ठपका ठेवला जातो. आज धोनी तीच संध्याछाया अनुभवत असणार. थेट फेकीमुळं धावबाद झाल्यानंतर परतणाऱ्या धोनीची देहबोली बरंच काही बोलून जाणारी होती. वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत संघ गारद झाल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर होतं. 'फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरल्याची व्यक्तिगत उदासी त्याच्या चेहऱ्यावर होती. या सगळ्याच्या तळाशी होती ती आपला स्वतःचा डाव आटोपल्याची खोल जाणीव. पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या धोनीचा चेहरा मला हेच सांगत होता. केवळ भारतीय नव्हे तर जगाच्या क्रिकेट इतिहासात 'एमएसडी'सारखा धीरोदात्त पण तितकाच स्फोटक ‘फिनिशर’ झालेला नाही. अशा महान खेळाडूचा 'एन्ड' पाहणं माझ्यासाठी भारताच्या पराभवापेक्षाही जास्त दुःखद आहे. 

कल्पना करा. धोनीनं त्याच्या 'हॉलमार्क' शैलीत मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये, त्यातही शक्यतो शेवटच्या चेंडूला सीमापार फेकून दिलं असतं तर... हाच धोनी हलकं स्मितहास्य करत स्वतःच्याच धुंदीत पॅव्हेलियनकडं परतला असता. स्टेडियममध्ये घुमणार्या 'धोनी-धोनी-धोनी'च्या गगनभेदी गजरामुळं तो भारावून गेला नसता. संघातले सगळे खेळाडू आनंदानं चित्कारत अंगावर उड्या घेताहेत म्हणून फार तर चेहऱ्यावरची एखादी रेष हलली असती त्याच्या. बास. मग शांतपणे ग्लोव्हज काढून न्यूझीलंडच्या खेळाडूंशी, अंपायरशी हस्तांदोलन केलं असतं. मनात आलंच असतं तर प्रेक्षकांना हात दाखवला असता आणि क्षणार्धात ड्रेसिंग रूममध्ये गडप झाला असता. यातलं काही घडलं नाही. मैदानात नेहमीच निर्विकार असणाऱ्या धोनीचा चेहरा आज बोलत होता आणि त्यातून निघणारे सूर हरलेले होते.
Love you man.
तू दिलेला आनंद अपरिमीत आहे.
Goodbye!

लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पण अन् निवृत्तीनं जुळवून आणला अजब योगायोग!

महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली

MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

 महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MS Dhoni Retirement: MS Dhoni played last ODI in World cup against NZ, he realize it's time to retire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.