IND vs SA 1st Test South Africa Beat India Defeat Five Reason : भारतीय संघाला कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागला. गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेच्या संघानं बेस्ट कामगिरीसह पहिल्या सामन्यात ३० धावांनी पिछाडीवर राहून तेवढ्याच धावांनी विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून टेम्बा बावुमाच्या दुसऱ्या डावातील अर्धशतकाशिवाय सायमन हार्मनच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. दोन डावात ८ विकेट्स घेत तो भारतीय चार फिरकीपेक्षाही भारी ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील या दोन स्टार खेळाडूंच्या दमदार कामगिरीशिवाय टीम इंडियाच्या चुकीच्या रणनितीमुळे टीम इंडियावर नामुष्की ओढावली. इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाच्या पराभवामागच्या पाच प्रमुख कारणांवर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीरच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह
भारतीय संघाची फलंदाजी फिरकीसमोर नेहमीच सर्वोत्तम राहिली आहे. पण गतवर्षी न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला घरच्या मैदानात ३-० अशी क्लीन स्वीप दिली. या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजीत फिरकीचा सामना करण्याची पूर्वीची धमक राहिली नाही, ते दिसून आले. ही उणीव भरून काढण्यासाठी टीम इंडियाने काहीच काम केलेले नाही, हे चित्र अगदी स्पष्ट होत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सरफराज खानसारख्या खेळाडूकडे दुर्लक्ष करून गंभीर आणि निवड समितीने मोठी चूक केली आहे का? असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर निर्माण होतो.
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
साई सुदर्शनला बाकावर बसून अष्टपैलू खेळाडूवर दाखवलेला भरवसा अंगलट आला?
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर नवा प्रयोग केला. साई सुदर्शनला बाकावर बसवून वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पहिल्या डावात अपयशी ठरल्यावर दुसऱ्या डावात त्याने धमक दाखवली. पण असा प्रयोग करायला हा काही टी-२० सामना नव्हता. प्रमुख फलंदाजाच्या जागी ऑलराउंडरला पसंती देण्याचा डाव टीम इंडियाच्या अंगलट आला, असे म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.
आधीच मोठी चूक त्यात पडली शुभमन गिलची दुखापतीची भर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल आणि शुभमन गिल यांच्यावर आघाडीच्या फलंदाजीच प्रमुख धुरा होती. ऑलराउंडरच्या रुपात वॉशिंग्टनच्या प्रयोगात प्रमुख खेळाडूचा पत्ता कट केला असताना शुभमन गिलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची आघाडीच्या फळीतील फलंदाजी आणखी कमकूवत झाली. त्याची किंमत टीम इंडियाला पराभवाच्या रुपात मोजावी लागली.
बावुमानं नाबाद अर्धशतकी खेळीसह टेन्शन वाढवलं
कोलकाताच्या खेळपट्टीवर कोच गौतम गंभीरनं समाधान व्यक्त केलं. पण ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अजिबात अनुकूल नव्हती. त्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात टेम्बा बावुमान तग धरून बॅटिंग करताना अर्धशतक झळकावलं. दुसरीकडे भारतीय संघाकडून लोकेश राहुलनं पहिल्या डावात केलेली ३९ धावांची खेळी ही सर्वोच्च ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे अर्धशतक मॅचचा टर्निंग पॉइंट ठरले.
दक्षिण आफ्रिकेच्या सायरन हार्मरची फिरकीतील जादू अन् टॉस ठरला जमेची बाजू
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात १५९ धावांत ऑलआउट झाल्यावर त्यांचा निर्णय फसल्याचे चित्र निर्माण झाले. पण त्यांच्या या निर्णयामुळे चौथ्या डावात भारतीय संघाला बॅटिंग करायची होती. दुसऱ्या डावात दीडशेपार धावा करत दक्षिण आफ्रिकेनं पिछाडीवर असताना टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना सायरन हार्मरनं आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. पार्ट टाइमच्या रुपात मार्करम याने टीम इंडियाची होप असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला माघारी धाडले अन् दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा मार्ग सोपा केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कोलकाताच्या खेळपट्टीवर टॉस जिंकण्यासोबतच प्रमुख फिरकीपटूसह मोक्याच्या क्षणी विकेट टेकर मार्करमचा योग्य वापर करून सामन्याला कलाटणी देणारा परफेक्ट गेम प्लॅन खेळला. त्यांचा हा डाव चार फिरकीपटू घेऊन टीम इंडियाने मोठी चूक केली आहे हे दाखवून देणारा असाच होता.