ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. ऑस्ट्रेलियाः भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम 352 धावांची खेळी केली. भारताच्या या एव्हरेस्टएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी सावध खेळ केला. कर्णधार अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी कोणताही धोका पत्करला नाही. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरेल असे वाटत होते, परंतु दोघांमधील समन्वय चुकला आणि ऑसींना पहिला धक्का बसला. वॉर्नर दुसरी धाव घेण्यास धावला, पण फिंचच्या मनात हो-नाय ची तळमळ सुरू होती. अखेरीस त्यानेही धाव घेतली आणि केदार जाधवच्या थ्रो वर हार्दिक पांड्याने त्याला धावबाद केले. चांगली खेळी करणाऱ्या फिंचला बाद केल्यानंतर भारतीय चमूत जल्लोष झाला. फिंच मात्र प्रचंड नाराजी प्रकट करत पेव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्यानं ड्रेसिंग रूममध्ये शिरताच आपली बॅट जोरानं दिवाळावर आदळली.
शिखर धनवची दुखापत गंभीर, म्हणून आला नाही फिल्डींगला?ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या शिखर धवनला दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याच्या अंगठ्याला ही दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला वैद्यकिय मदत घ्यावी लागली. पण, तरीही तो मैदानावर टिकून राहिला आणि त्याने 117 धावांची खेळी करताना भारतीय संघाला 352 धावांपर्यंत मजल मारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पण, धवन त्यानंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. त्याच्याजागी रवींद्र जडेजा मैदानावर दिसला. त्यामुळे धवनची दुखापत गंभीर असल्याची चर्चा रंगली आहे.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.