अॅशेस कसोटी मालिका गमावल्यावर इंग्लंडचा संघ अखेर जागा झाला आहे. मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीच इंग्लंडच्या संघाने ४ विकेट्स राखून यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लंडने सहज गाठले. जोश टंग, जेकब बेथेल आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडच्या संघाने अखेर विजय मिळवला
ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. चौथ्या सामन्यात इंग्लंडचा संघ लाज राखण्यासाठी मैदानात उतरला होता. मेलबर्नचं मैदानात मारत इंग्लंडने मोठी नामुष्की टाळली. एवढेच नाही तर या विजयासह इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाची बरोबरी केली आहे.
Most Catches In Test : स्टीव्ह स्मिथनं मोडला द्रविडचा रेकॉर्ड! इथं जो रुट आहे टॉपला
इंग्लंडच्या संघाने केली टीम इंडियाशी बरोबरी
मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ३५ व्या विजयाची नोंद केली. भारतीय संघानेही या स्पर्धेत ३५ सामने जिंकल्याची नोंद आहे. सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलिया सर्वात आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावे ३९ विजयाची नोंद आहे.
WTC मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
- ऑस्ट्रेलिया- ३९
- इंग्लंड- ३५
- भारत- ३५
- दक्षिण आफ्रिका- २५
- न्यूझीलंड- २१
२०११ नंतर ऑस्ट्रेलियन मैदानात इंग्लंडने मिळवलेला हा पहिला विजय ठरला
इंग्लंडच्या संघाने जवळपास १५ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कसोटी सामना जिंकला आहे. याआधी जानेवारी २०११ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला होता. त्या वेळी अँड्र्यू स्ट्रॉस इंग्लंडचा कर्णधार होता, तर अॅलिस्टर कुकने १८९ धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा इंग्लंडला ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आला आहे.
इंग्लंडसाठी जोश टंग राहिला या मॅचचा हिरो
सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जोश टंगच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज टिकू शकले नाहीत, पहिल्या डावात टंगनं मारलेल्या 'पंजा'मुळे ऑस्ट्रेलियाचा संघ १५२ धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ११० धावांत आटोपला होता. ४२ धावांच्या अल्प आघाडी मिळवल्यावर ऑस्ट्रेलिया हा सामनाही सहज जिंकेल, असे वाटत होते. पण इंग्लंडने दमदार कमबॅक केले. दुसऱ्या डावात ब्रायडन कार्सेने ४ विकेट्स घेतल्या. कर्णधार बेन स्टोक्सने ३ बळी मिळवले. या प्रभावी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात १३२ धावांत आटोपला. इंग्लंडच्या संघाला १७५ धावांचे लक्ष्य मिळाले. या धावांचा पाठलाग करताना जॅक क्रॉली (३७), बेन डकेट (३४) आणि जेकब बेथेल (४०) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.