बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:28 IST2025-09-03T15:27:23+5:302025-09-03T15:28:16+5:30

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली.

Chhattisgarh Chief Minister Vishnu Dev Sai rushes to help Bastar flood victims! There will be no laxity in rescue operations; Clear instructions to officials | बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

बस्तर पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री! बचावकार्यात हलगर्जीपणा चालणार नाही; अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

छत्तीसगडमधीलबस्तर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री साय यांनी दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवणे हे राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री दंतेवाडा येथील चूडीटिकरा वॉर्डात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मदत छावणीत पोहोचले. तिथे त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "शासन प्रत्येक पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. मदत छावण्यांमध्ये योग्य प्रमाणात अन्न, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध राहील याची खबरदारी घ्या."

प्रत्येक कुटुंबाला मदत द्या!

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी मदत छावणीत सुरू असलेल्या आरोग्य शिबिराचीही पाहणी केली. त्यांनी डॉक्टरांची नेमणूक आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य सेवांची माहिती घेतली. तुम्ही प्रशासनाच्या मदतीवर समाधानी आहात का?, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्तांना केली. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नाला पूरग्रस्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा!

पूरग्रस्तांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री साय यांनी पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. पूरग्रस्त गावांमध्ये रस्ते, वीज आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मदत आणि पुनर्वसनामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

या पाहणीनंतर मुख्यमंत्री साय यांनी दंतेवाडा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. मदत आणि बचाव कार्याची प्रगती, पुनर्वसन योजना आणि पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तात्काळ मदतीची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. पूरग्रस्त गावांमध्ये प्रशासकीय पथकांचा सतत संपर्क राहील आणि प्रत्येक गरजूपर्यंत मदत वेळेवर पोहोचेल, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री केदार कश्यप, महसूल मंत्री टंकराम वर्मा, खासदार महेश कश्यप, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सुबोध कुमार सिंह, महसूल सचिव आणि आपत्ती निवारण आयुक्त रीना बाबासाहेब कंगाले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chhattisgarh Chief Minister Vishnu Dev Sai rushes to help Bastar flood victims! There will be no laxity in rescue operations; Clear instructions to officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.