चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल
By विजय सरवदे | Updated: April 10, 2024 16:57 IST2024-04-10T16:53:24+5:302024-04-10T16:57:44+5:30
सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सारेच मश्गूल

चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस चारा, पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. एप्रिलमध्येच ३३७ गावांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर उपलब्ध असलेला चाराही सुमारे ११.५ लाख पशुधन जगविण्यासाठी अपुरा पडत आहे.
टँकरमुक्तीसाठी मागील २५ वर्षांपासून सरकारने अनेक योजना आणल्या. त्यासाठी कैक कोटींचा चुराडा झाला; पण अजूनही अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहेत. त्यामुळे दरवर्षी टँकर सुरू करावे लागतात, याला जबाबदार कोण, सध्या निवडणुकीच्या धामधुमीत सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी मश्गूल असलेली राजकीय मंडळी चारा, पाण्याच्या प्रश्नावर बोलणार की नुसतीच मते मागणार, असे प्रश्न सामान्य मतदारांतून विचारले जात आहेत. गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत.
परिणामी, ऑक्टोबरपासूनच अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. मोलमजुरी सोडून नागरिकांना घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहण करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, नवीन विंधन विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांसाठी ऑक्टोबर ते जून नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी ८१ कोटी ४० लाखांचा कृती आराखडा केला आहे. सध्या २२६ विहिरींचे अधिग्रहण केले असून त्यातून ३३७ गावांची तहान भागविली जात आहे.
ज्यांच्याकडे शेती आहे, अशा पशुपालक शेतकऱ्यांकडे ४ ते ५ महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, शेती नसलेल्या पशुपालकांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या पशुधनाचे काय. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सतावत असल्याने अनेक पशुपालकांनी कवडीमोल किमतीत जनावरे विक्रीला काढली आहेत. सामान्य जनतेच्या जगण्याच्या या प्रश्नांवर गावपुढारीही बोलायला तयार नाहीत. या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे लक्ष राहू द्या, एवढेच काय ते बोलून निघून जातात. चारा, पाणी, रेशन, रोहयोच्या मजुरीत वाढ हे प्रश्न निकाली काढण्यासाठी जो सक्षम असेल, त्यालाच आता मतदान करणार, असा सूर सर्वसामान्य मतदारांतून निघाला आहे.
४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ३३७ गावांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील दोन- अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामीण जनतेला लागली असून त्यासंदर्भात उपाययोजना करण्यास प्रशासनाने कंबर कसली आहे. सध्या तरी २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती
४४३ एकूण टँकर
२२६ विहिरी अधिग्रहित
कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरू
छत्रपती संभाजीनगर- ६०
फुलंब्री- ५१
सिल्लोड- ६९
सोयगाव- ००
कन्नड- १८
खुलताबाद- ००
गंगापूर- १०२
वैजापूर- ७१
पैठण- ७२
कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरू
छत्रपती संभाजीनगर- ०३
फुलंब्री- ४७
सिल्लोड- २१
सोयगाव- ०३
कन्नड- ४०
खुलताबाद- १०
गंगापूर- २४
वैजापूर- ७५
पैठण- ०३
४-५ महिने पुरेल एवढा चारा?
- ४ ते ५ महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ज्यांच्याकडे शेती नाही अशा पशुपालकांचे काय? यावर प्रशासनाकडे उत्तर नाही. आजही हजारो पशुधन चाऱ्यासाठी उजाड माळावर भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. खरीप, रबी तसेच पशुसंवर्धन व कृषी विभागाने केलेल्या उपाययोजनांद्वारे पशुपालक शेतकऱ्यांकडे ११ लाख ८७ हजार ७७८ मेट्रिक टन चारा शिल्लक असल्याची प्रशासनाच्या दप्तरी आकडेवारी आहे.
जिल्ह्यात ११.५२ लाख पशुधन
जिल्ह्यात लहान जनावरांची संख्या १ लाख ५८ हजार २५१, मोठी जनावरे ४ लाख ७४ हजार ७५२ आणि ५ लाख १९ हजार ४२६ शेळी- मेंढी, असे मिळून ११ लाख ५२ हजार ४२८ पशुधन आहे. या जनावरांना रोज ३ हजार ८४३ मेट्रिक टन वाळलेला चारा लागतो.