१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

By विजय सरवदे | Published: May 9, 2024 04:43 PM2024-05-09T16:43:56+5:302024-05-09T16:48:14+5:30

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार डॉ. मोहन देशमुख म्हणाले,

Rajiv Gandhi came to campaign but the result of 1991 Aurangabad Lok Sabha was changed due to vote division | १९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

छत्रपती संभाजीनगर : ‘काँग्रेसचे तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांना राज्यसभेवर घेण्याचे आश्वासन देऊन पक्षश्रेष्ठींनी १९९१च्या निवडणुकीत महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या कोट्यातून एकमेव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आपल्याला उमेदवारी दिली. खरंतर ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आमच्या दोघांत मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्यामुळेच आपला पराभव झाला. अन्यथा, या जागेवर आपला विजय निश्चित होता,’ अशी आठवण डॉ. मोहन देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर डॉ. देशमुख म्हणाले, ‘तेव्हाच्या निवडणुकीत पक्षनेतृत्व किंवा उमेदवारांवर वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्वरूपाची टीका केली जात नव्हती. विकासाच्या मुद्यावर मते मागितली जायची. अलीकडच्या काळात प्रचाराची पातळी घसरली आहे. विकासाच्या मुद्यांवर मते मागण्याऐवजी धर्माच्या नावाने राजकारणाचे ध्रुवीकरण केले जात आहे, हे क्लेशकारक आहे. सत्ताधारी जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा मतदारांना दिलेल्या आश्वासनांची त्यांनी किती पूर्तता केली. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशेब देत नाहीत. 

सध्या देशभरातील प्रचार बघितला, तर फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. गांधी कुटुंबावर घराणेशाहीची टीका करताना विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, देशासाठी बलिदान देण्याची या कुटुंबाची परंपरा आहे. देशाने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे. याचा अर्थ ते या देशाचे महान रत्न होते. तरीही केवळ राजकारणाच्या द्वेषापोटी त्यांच्या कुटुंबाला हिणवले जाते, ही कोणत्याही नेत्याला शोभणारी गोष्ट नाही.’

आमखास मैदानावर राजीव गांधींची सभा
१९९१ च्या निवडणुकीविषयी त्यांनी सांगितले की, डॉ. रफिक झकेरिया हे उच्चविद्याविभुषित होते. ते बरीच वर्ष काँग्रेसचे मंत्री होते. त्यांचा आजही आदर आहे. निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि युवक काँग्रेसच्या कोट्यातून मीदेखील अर्ज केला होता. दिल्लीत आम्ही दोघेही वसंत साठे यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला उमेदवारी देण्यासाठी आश्वासित केले. त्यानंतरही डॉ. झकेरिया यांना तिकीट मिळाले, तर आम्ही सारेजण झपाटून तुमचा प्रचार करू, असे त्यांना बोललो होतो. मात्र, आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी नाराजीतून जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढली. माझ्या प्रचारासाठी खुद्द राजीव गांधी या शहरात आले आणि आमखास मैदानावर त्यांनी सभा घेतली होती. मात्र, मतविभाजनामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title: Rajiv Gandhi came to campaign but the result of 1991 Aurangabad Lok Sabha was changed due to vote division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.