खानाला थांबविण्यासाठी बाणाची नव्हे, भाजपच्या भगव्याची शान पुरेशी: नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:39 IST2026-01-12T18:38:04+5:302026-01-12T18:39:21+5:30
हिंदुत्वासाठी सर्वांनी एकजुटीने मतदान करा, नितेश राणेंचे आवाहन

खानाला थांबविण्यासाठी बाणाची नव्हे, भाजपच्या भगव्याची शान पुरेशी: नितेश राणे
छत्रपती संभाजीनगर : खानाला थांबवायचे असेल तर आता बाणाची गरज नाही. भाजपच्या भगव्याची शानच पुरेशी आहे, असे मत बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी रात्री केले. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरांच्या खुर्चीवर ‘आय लव्ह महादेव’वालाच बसला पाहिजे, त्यासाठी हिंदूंनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. राणे यांच्या पदमपुरा प्रभाग १८, गुलमंडी १५, १६, १७, पुंडलिकनगर परिसरातील प्रभाग क्र.२२, २३, २७ येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाल्या. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह भाजप उमेदवारांची उपस्थिती होती.
गुलमंडी येथील सभेत मंत्री राणे म्हणाले की, या निवडणुकीकडे ’खान विरुद्ध बाण’ म्हणून पाहावे. शहराकडे वाकड्या नजरेने पाहणारे उमेदवार उद्धवसेनेने दिले आहेत. त्यामागील षडयंत्र समजून घ्यावे. उद्धवसेनेने समान नागरी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चाला, बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप मंत्री राणे यांनी केला.
पदमपुऱ्यातील सभेत राणे म्हणाले, येथे कुणाचे व्हाईट किंवा ब्लॅक हाऊस असू द्या. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सगळे हाऊसवाले देवाभाऊंसमोर नतमस्तक होतात. त्यांनी डोळे वटारले तर बॅग उचलायलासुद्धा हात राहणार नाहीत, अशी टीका एका व्हायरल व्हिडीओवर त्यांनी केली. तसेच एमआयएम आणि काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले.
पुंडलिकनगर परिसरातील विजयनगर येथे राणे म्हणाले, हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची निवडणूक आहे. जिहादी वृत्ती विरोधात ही निवडणूक आहे. शहरात इस्लामीकरण सुरू आहे, प्रत्येक वाॅर्डात लव्ह जिहाद आहे. त्यामुळे १५ रोजी भाजपच्या उमेदवारांना मतदान करा. यावेळी उमेदवार अनिल मकरिये, बंटी चावरिया, लक्ष्मीकांत थेटे, सुवर्णा तुपे, अशोक दामले, पुष्पा निरपगारे, राजू वैद्य, स्वाती साळुंके, दया गायकवाड, मयूरी बरथुने, संजय बारवाल, मनीषा भन्साली, मनदीप परदेशी, प्रमोद राठोड, बालाजी मुंडे, सुरेखा गायकवाड, सत्यभामा शिंदे आदींची उपस्थिती होती.
केंद्र व राज्याच्या योजनांसाठी भाजप हवा
केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महापालिकेवर देखील भाजपचा महापौर बसला पाहिजे. जेणेकरून अनेक केंद्र व राज्याच्या योजना शहरात येतील, शहराचा चौफेर विकास होईल. त्यासाठी १५ रोजी सर्व ठिकाणी कमळ निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले.