प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:06 IST2024-05-11T13:06:04+5:302024-05-11T13:06:24+5:30
छत्रपती संभाजीनगरात हायव्होल्टेज ड्रामा; महायुती- महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
छत्रपती संभाजीनगरात: क्रांती चौकात आज दुपारी महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्हीकडील कार्यकर्त्यांकडून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
ठाकरे सेनेची मशाल विरुद्ध शिंदेसेनेचा धनुष्यबाण असा थेट सामना औरंगाबाद लोकसभेत होत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघेही आपआपल्या उमेदवारांसाठी शहरात होते. आज दोन्हीकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात करण्यात आले. महायुतीची रॅली शिवाजीनगर येथून निघून क्रांतीचौक मार्गे टीव्ही सेंटर येथे जाणार होती. तर महाविकास आघाडीची रॅली क्रांतीचौक येथून निघणार होती. दरम्यान, दुपारी बारा वाजता दोन्ही रॅली समोरासमोर आल्या. यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
एकमेकांच्या उमेदवारांना केले लक्ष
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दारूच्या बॉटल हातात घेऊन महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना डिवचले. तर शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी चंद्रकांत खैरे यांच्या समोर जात दंड थोपटले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील यात उडी घेत ठाकरे गटावर शेरेबाजी केली. यावर दानवे यांनी उमेदवार नसलेल्यांनी काही बोलू नका म्हणत पलटवार केला. दरम्यान, यामुळे क्रांती चौकट प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.