बदलते राजकारण! 'ते सोबत असते तर खासदार असते'; खैरेंच्या दाव्याला संजय शिरसाटांची पुष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:26 IST2025-01-30T12:25:59+5:302025-01-30T12:26:49+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शिंदेसेना खैरेंना ऑफर दिल्याबाबत पुष्टी करीत आहे.

बदलते राजकारण! 'ते सोबत असते तर खासदार असते'; खैरेंच्या दाव्याला संजय शिरसाटांची पुष्टी
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना मीच शिंदेसेनेत येण्याची ऑफर दिली हाेती. ते सोबत आले असते तर आज खासदार राहिले असते, असा दावा करीत शिंदेसेनेचे प्रवक्ते पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. खैरेंनी ऑफर नाकारली. त्यामुळे त्यांच्यावर आता माजी खासदार म्हणून फिरण्याची वेळ आलीय, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.
लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शिंदेसेना खैरेंना ऑफर दिल्याबाबत पुष्टी करीत आहे. खैरेदेखील ऑफर मिळाली होती, हे सहा महिन्यांनी सांगत आहेत. त्यामुळे यामागे काही तरी राजकारण शिजत असल्याची चर्चा आहे.
उद्धवसेनेला गळती लागली आहे, त्यामुळे खैरेंना आता पुन्हा ऑफर मिळणे अवघड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे उद्धवसेनेतील अनेक जण शिंदेसेनेत जात आहेत. खैरे यांना खरेच शिंदेसेनेने ऑफर दिली होती की, ते स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी दावा करीत आहेत. यावरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. परंतु शिरसाट यांनी आपणच ‘ऑफर’ दिल्याचे सांगून खैरेंच्या दाव्याला बळ दिले. शिंदेसेनेकडून खासदारकी आणि राज्यपालपदाची ऑफर भाजपने दिल्याचा दावा खैरेंनी केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्या दाव्यावर जोरदार टीका करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या.
काय म्हणाले होते खैरे?
लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदेसेनेकडून उमेदवारीची व भाजपकडून पक्षप्रवेशासह राज्यपालपदाची ऑफर मिळाली होती, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. परंतु मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या ऑफरला नाकारले. उद्धवसेनेतून मी बाहेर पडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. यावर शिरसाट यांनी खैरेंच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले.
शिंदेसेनेतील गटबाजीमुळे प्रवेश थांबला
उद्धवसेनेला विधानसभा निवडणुकीनंतर गळती लागली आहे. उद्धवसेनेतील शिंदेसेनेच्या वाटेवर अनेक जण आहेत. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येथील काही जणांची जालन्यात प्रवेशाची तयारी झाली. परंतु पालकमंत्री आणि आमदारांना याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यामुळे उद्धवसेनेच्या चार नगरसेवकांचा प्रवेश लांबणीवर पडला. प्रवेशावरून शिंदेसेनेतही गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरचा प्रवेश जालन्यात कशासाठी, असा प्रश्न उद्धवसेनेतील त्या माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या एका पदाधिकाऱ्याकडे उपस्थित केल्याची चर्चा आहे.