मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:01 IST2026-01-03T16:00:31+5:302026-01-03T16:01:58+5:30

८३ जणांची माघार, ४५१ रिंगणात : मनपात भाजप-शिंदेसेना, काँग्रेस व उद्धवसेना-वंचितमध्ये लढतीचे चित्र, अपक्षांकडे लक्ष

Rebellion erupts in municipal elections! Congress has the highest number of 63 candidates in the fray in Chandrapur, while BJP has 56. | मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात

Rebellion erupts in municipal elections! Congress has the highest number of candidates, 63, while BJP has 56.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. या यादीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून आली आहे. पक्ष नेतृत्वासह व नाराजी व्यक्त करत अनेक इच्छुकांनी बंडखोर म्हणून अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेतृत्वासमोर ऐन निवडणुकीत आव्हान निर्माण झाले असून, या बंडखोरीचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील १७ प्रभागांच्या ६६ जागांसाठी नामांकन दाखल केलेल्या ५३४ उमेदवारांपैकी गुरुवारी (दि. १) तीन व शुक्रवारी (दि. २) शेवटच्या दिवशी ८० अशा एकूण ८३ उमेदवारांनी माघार घेतली. ४५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पक्षाने तिकीट नाकारलेल्या असंतुष्टांनी १० प्रभागांत नामांकन कायम ठेवल्याने भाजपसह काँग्रेसलाही फटका बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

६६ जागांसाठी आपापल्या प्रभागांत उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप व काँग्रेसच्या इच्छुकांनी प्रयत्न केले होते. मात्र, या दोनही पक्षांतील स्थानिक नेत्यांच्या वर्चस्ववादी भूमिकेने अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तिकीटापासून मुकावे लागले. भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षांनी तर प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी बदलवून मर्जीच्या उमेदवारांची नावे घुसविल्याचा आरोप झाला. काँग्रेसनेही अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे तिकीट कापून नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली. या नाराजीमुळे भाजपसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढण्यास सज्ज झाले. शुक्रवारी (दि.२) दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. गुरुवारी (दि. १) स्थानिक नेते व दिग्गज उमेदवारांकडून माघार घेण्यासाठी जोरदार हालचाली झाल्या होत्या. नेत्यांच्या दबावामुळे काहींनी नामांकन मागे घेतले. ५३४ उमेदवारांपैकी ८३ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. १७पैकी १० प्रभागांत बंडखोरांची उमेदवारी कायम असल्याने भाजप व काँग्रेसचीही डोकेदुखी वाढणार आहे.

काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात 

काँग्रेसचे सर्वाधिक ६२ व भाजपने ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्धवसेना ३१, राष्ट्रवादी (अजित पवार) ३०, राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना ९९, वंचित बहुजन आघाडी २४, आम आदमी पक्ष २१ व जनविकास सेनेचे ३ उमेदवार रिंगणात आहेत.

आज मिळणार उमेदवारांना निवडणूक चिन्ह

निवडणूक रिंगणात कायम असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना शनिवारी दि. ३ सकाळी ११ वाजतापासून निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी याच दिवशी सकाळी ११ वाजता प्रकाशित करण्यात येणार आहे.

असे आहेत बंडखोर

काँग्रेस: काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया व प्रशांत दानव यांना पक्षाने तिकीट नाकारले हे तीनही उमेदवार अनुक्रमे महाकाली मंदिर प्रभाग, वडगाव व विठ्ठल मंदिर प्रभागातून अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केली. काँग्रेसच्या माजी नगरसेविका वीणा खनके यांनी राकाँ (अजित पवार) कडून उमेदवारी दाखल केली. नागरकर यांनी स्वतःचे पॅनल तयार करून तीन उमेदवार उभे केले होते. त्यातील प्रज्ञा देव यांनी माघार घेतली.

भाजप : तुकूम प्रभागातील पुरुषोत्तम सहारे, शीला चव्हाण, शास्त्रीनगर प्रभागात सुनील डोंगरे, एमईएल प्रभागातून पूजा पोतराजे, बंगाली कॅम्प प्रभाग ड मधून अजय सरकार, राकेश बोमनवार, नगीनाबाग प्रभागातून दीप्ती शेंडे, वडगाव प्रभाग ८ मधून रवी जोगी यांनी उमेदवारी कायम ठेवून भाजपविरोधात बंडखोरी केली आहे. याशिवाय नव्यानेच भाजपमध्ये आलेले काही युवा कार्यकर्तेदेखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या यादीतील भाजप उमेदवारही अपक्षांत

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या यादीतील उमेदवारांना स्थानिक नेत्यांनी तिकिटापासून डावलले होते. त्यातील प्रभाकर सहारे, माया उईके, सोहम बुटले, शुभांगी दिकोंडावार, मनीष बावणे, कुणाल गुंडावार, पंचशील चिवंडे, हरीश मंचलवार, वंदना भागवत यांनी उमेदवारी कायम ठेवली. भाजपचे विशाल निंबाळकर हे विठ्ठल मंदिर प्रभागात उद्धवसेनेकडून निवडणुकीत लढवत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक नागापुरे, देवेंद्र बेले यांनी बंडखोरी करीत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडी या पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवली.

१ जानेवारीला ३ तर शुक्रवारी शेवटच्या दिवशी ८० उमेदवारांनी घेतली माघार

३० डिसेंबर २०२५ रोजी ५७० उमेदवारांचे ६०६ अर्ज प्राप्त झाले. यात ३२ उमेदवारांचे डबल तर २ उमेदवारांचे ट्रिपल अर्ज होते. छाननीत ५५७ वैध तर २३ अवैध ठरले. ५३४ अर्ज शिल्लक होते. १ जानेवारीला तिघांनी माघार घेतल्याने ५३१ उमेदवार होते. आज शेवटच्या दिवशी ८० उमेदवारांची माघार घेतल्याने ४५१ उमेदवार रिंगणात आहेत.


 

Web Title : चंद्रपुर मनपा चुनाव में बगावत! कांग्रेस, बीजेपी को चुनौती

Web Summary : चंद्रपुर मनपा चुनाव में कांग्रेस और बीजेपी में बगावत। टिकट न मिलने पर कई उम्मीदवार स्वतंत्र रूप से मैदान में रहे। कांग्रेस के 63, बीजेपी के 56 उम्मीदवार हैं। इस बगावत से चुनाव समीकरणों पर असर पड़ने की संभावना है।

Web Title : Rebellion Erupts in Chandrapur Municipal Elections; Congress, BJP Face Challenges

Web Summary : Chandrapur municipal elections see rebellion in Congress and BJP. Many aspirants remained in the fray independently after being denied tickets. Congress has 63, BJP 56 candidates. This rebellion is likely to impact election dynamics significantly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.