'आनंदाच्या शिधा'सोबत दारु-बिअर देऊ; चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवाराचं अजब आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:34 PM2024-04-01T17:34:40+5:302024-04-01T17:35:14+5:30

Chandrapur Loksabha Election 2024: चंद्रपूरात गेले कित्येक वर्ष दारुबंदी आहे. त्याचा फायदा या महिला उमेदवाराने प्रचारासाठी घेतला आहे

In Chandrapur Lok Sabha Constituency, Vanita Raut has promised to give alcohol and beer to the people | 'आनंदाच्या शिधा'सोबत दारु-बिअर देऊ; चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवाराचं अजब आश्वासन

'आनंदाच्या शिधा'सोबत दारु-बिअर देऊ; चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवाराचं अजब आश्वासन

चंद्रपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या भागात सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्यात उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कुणी पदयात्रा काढतंय, तर कुणी घरोघरी प्रचार करतंय. पण यातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उभं राहिलेल्या एका महिला उमेदवाराने अजब आश्वासन मतदारांना दिले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार कायम आश्वासनांची खैरात प्रचार काळात करतात. त्यात या महिला उमेदवाराने दिलेले आश्वासन ऐकून सर्वच अचंबित झाले आहेत. 

या महिला उमेदवाराचं नाव आहे वनिता राऊत, त्या अखिल भारतीय मानवतावादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्रपूरात गेले कित्येक वर्ष दारुबंदी आहे. त्याचा फायदा या महिला उमेदवाराने प्रचारासाठी घेतला आहे. वनिता राऊत म्हणाल्या की, गाव तिथे बिअर बार, पिणाऱ्याकडे आणि विक्री करणाऱ्याकडे परवाना असायला हवा. कायदेशीर मार्गाने दारूविक्री झाली पाहिजे. अजून पर्यंत सरकारने त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे मला पुन्हा निवडणुकीत उभं राहायला लागलं असं त्यांनी सांगितले. 

इतकेच नाही तर सरकार आनंदाचा शिधा वाटते, रेशन कार्डवर साड्याही मिळतात. जर चंद्रपूरच्या लोकांनी मला खासदार बनवलं तर आनंदाचा शिधासोबत व्हिस्की, बिअर जी काही उच्च दारू आहे. ती माझ्या खासदार निधीतून व्हिस्की, दारू देईन असं आश्वासन दिले आहे. २०१९ च्या चिमूर विधानसभा निवडणुकीवेळीही वनिता राऊत उभ्या होत्या. त्यावेळीही गाव तिथे बिअरबार असं आश्वासन त्यांनी लोकांना दिले होते. चंद्रपूरला शेजारील इतर जिल्ह्यात दारूबंदी नाही मग चंद्रपूरकरांनी काय केलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरकरांनी वनिता राऊत यांच्या आश्वासनाला फार दाद दिली नाही. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र पुन्हा एकदा वनिता राऊत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी लोकांना पुन्हा साद घातली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पार्टी महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्येही ही लढत होणार आहे. 
 

Web Title: In Chandrapur Lok Sabha Constituency, Vanita Raut has promised to give alcohol and beer to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.