'काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं'; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी भाजपाला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:14 IST2024-04-17T15:11:01+5:302024-04-17T15:14:54+5:30
Chandrapur Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.

'काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं'; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी भाजपाला डिवचलं
Chandrapur Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांसाठी सभांचा धडाका सुरू आहे. देशात लोकसभेच्या सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत, पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.चंद्रपूरमध्येकाँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्याविरोधात भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. दरम्यान, प्रतिभा धानोरकर यांनी पुन्हा एकदा भाजपाला डीवचलं आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी प्रचारात सहभाग घेतला. यावरुनही धानोरकर यांनी टीका केली. "देशातील प्रत्येकाच्या मनात राम आहे, आज चंद्रपूरातील रामाचे दर्शन घेतले. प्रचार हा रामाच्या नावावरुन करत असले तरी राम कोणत्याही पक्षाला वाटलेले नाहीत. प्रत्येकाच्या मनात राम आहेत, त्यामुळे राम कोणत्या पक्षाचे नाहीत. कोण काँग्रेसचा, भाजपाचा, शिवसेना, राष्ट्रवादीचा असेल राम हे सगळ्यांचे आहेत. त्यामुळे रामाचा आणि राजकारणाचा विषय वेगळा आहे. रामाच्या नावावर जर कोण मत मागत असेल तर लोक मुर्ख नाहीत, असा टोलाही प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाला लगावला.
"१९ तारखेला लोक लोकशाहीच्या बाजूने राहणार आहेत, हुकूमशाही मोडकळीस आणण्याचे काम लोक करणार आहेत, असंही धानोरकर म्हणाल्या. फक्त सिनेअभिनेते प्रचारात आणले तर लोक मतदान करतात असा विषय नाही. शेवटी उमेदवार कसा आहे त्यावर सगळं आहे. आम्हाला प्रियांका गांधींची सभा मिळाली होती पण भाजपाने दुसऱ्याच नाव देऊन मैदान बुक केलं, असा आरोपही धानोरकर यांनी भाजपावर केला.