Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, या कालावधीत देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळाले. ७ मे २०२५ रोजी भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या या कारवाईनंतर देशात संरक्षण तंत्रज्ञान, डिफेन्स उत्पादन आणि निर्यात यांना मोठी चालना मिळाली. याचाच सकारात्मक परिणाम शेअर बाजारातील डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे.
गेल्या एका वर्षात HAL, BEL, Data Patterns India, Garden Reach Shipbuilders यांसारख्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. काही शेअर्सनी ४० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली, तर काहींनी तब्बल ९६ टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर डिफेन्स सेक्टरमध्ये तेजी
पहलगाम हल्ल्यातील निरपराध नागरिकांच्या हत्येनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईनंतर देशाने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि संरक्षण उत्पादनांवर अधिक भर दिला. त्यामुळे डिफेन्स सेक्टरकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आणि संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.
Data Patterns India ने दिला सर्वाधिक परतावा
डिफेन्स क्षेत्रातील Data Patterns India Ltd या कंपनीने गेल्या एका वर्षात सर्वाधिक परतावा देत गुंतवणूकदारांना चकित केले आहे. या कंपनीच्या शेअरने सुमारे ९६ टक्के परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, संरक्षण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे कंपनीला मोठा फायदा झाला.
Garden Reach Shipbuilders चे शेअर्सही झेपावले
Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd या सरकारी संरक्षण कंपनीनेही गुंतवणूकदारांना दमदार कमाई करून दिली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ७२ टक्क्यांची वाढ झाली. एक वर्षापूर्वी ₹१,७७६ वर असलेला शेअर आता ₹३,०८२ पर्यंत पोहोचला आहे. जहाजबांधणी आणि संरक्षण प्रकल्पांमधील वाढत्या ऑर्डर्समुळे कंपनीच्या कामगिरीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
BEL नेही गुंतवणूकदारांना दिला मजबूत परतावा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या देशातील प्रमुख संरक्षण कंपनीनेही गुंतवणूकदारांना निराश केले नाही. ७ मे २०२५ रोजी कंपनीचा शेअर सुमारे ₹३१० वर होता. आता तो जवळपास ₹४३६ वर पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात सुमारे ४१ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. रडार, कम्युनिकेशन सिस्टिम्स आणि संरक्षण उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे BEL ला मोठा फायदा झाला आहे.
HAL मध्येही सकारात्मक कामगिरी
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या देशातील प्रमुख एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनीच्या शेअरमध्येही स्थिर वाढ दिसून आली. ७ मे २०२५ रोजी HAL चा शेअर ₹४,४७० वर होता. ७ मे २०२६ रोजी तो वाढून सुमारे ₹४,७१५ वर पोहोचला. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही HAL ने सकारात्मक कामगिरी कायम ठेवली.
डिफेन्स सेक्टर ठरला ‘सोन्याची खाण’
गेल्या एका वर्षात इतर अनेक क्षेत्रांमध्ये अस्थिरता दिसून आली असताना डिफेन्स सेक्टरने मात्र मजबूत कामगिरी केली. वाढते सरकारी संरक्षण बजेट, ‘मेक इन इंडिया’ला मिळणारे प्रोत्साहन आणि डिफेन्स एक्सपोर्टमधील वाढ यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फायदा झाला. तज्ज्ञांच्या मते, भारताचा संरक्षण क्षेत्रातील वाढता आत्मनिर्भरतेकडे कल पाहता आगामी काळातही डिफेन्स शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ शकतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
