Share Market Closing: शेअर बाजारात गुरुवारी मोठ्या प्रमाणावर अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीला तेजीने सुरुवात झाल्यानंतर दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने सुरू असलेली विक्री, जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि नफावसुलीचा दबाव यामुळे बाजारातील वातावरण कमकुवत राहिले.
आजच्या सत्रात बीएसईचा सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरून ७७,८४४.५२ वर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक ४.३० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,३२६.६५ वर स्थिरावला. विशेष म्हणजे, मागील सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी १.२ टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली होती. मात्र गुरुवारी बाजारात नफावसुलीमुळे दबाव वाढल्याचे दिसून आले.
NSE वरील टॉप-५ घसरलेले शेअर्स :
| कंपनी | शेअर किंमत | घसरण | टक्केवारी |
|---|---|---|---|
| हिंदुस्तान युनिलिव्हर | ₹२,२७३ | ₹४४.१० | -१.९०% |
| TCS | ₹२,४०३ | ₹३२.४० | -१.३३% |
| टायटन | ₹४,३०९ | ₹५०.६० | -१.१६% |
| टेक महिंद्रा | ₹१,४५० | ₹१६.७० | -१.१४% |
| ITC | ₹३०७.५५ | ₹३.१५ | -१.०१% |
तेजीत राहिलेल्या प्रमुख कंपन्या :
महिंद्रा अँड महिंद्रा
NTPC
कोटक महिंद्रा बँक
टाटा स्टील
बाजारातील घसरणीमागची कारणे काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या शांतता प्रस्तावावर इराणची भूमिका काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता कायम आहे. एनरिच मनीचे CEO पोनमुडी आर यांच्या मते, भारतीय बाजार सध्या ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहे. निफ्टीमध्ये स्थिरता दिसत असली तरी गुंतवणूकदार पुढील तेजीपूर्वी अधिक स्पष्ट संकेतांची वाट पाहत आहेत.
तर लेमन मार्केट डेस्कचे रिसर्च अॅनालिस्ट गौरव गर्ग यांनी सांगितले की, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री आणि जागतिक स्तरावरील कमकुवत संकेतांमुळे बाजारावर दबाव कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत जागतिक राजकीय घडामोडी, FII ची गुंतवणूक आणि अमेरिकन आर्थिक संकेत यावर भारतीय शेअर बाजाराची दिशा अवलंबून राहील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
