Kotyark Industries Ltd Share: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बायोडीझेल आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोटयार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या मायक्रो कॅप कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बंपर गिफ्ट जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १०:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास मंजुरी दिली आहे.
बोनस शेअरचा नेमका अर्थ काय?
कंपनीच्या घोषणेनुसार, जर तुमच्याकडे कोटयार्क इंडस्ट्रीजचा १ शेअर असेल, तर त्यावर कंपनी तुम्हाला १० बोनस शेअर्स मोफत देणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांकडे असलेला १ शेअर आता थेट ११ शेअर्समध्ये बदलेल. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटत आहे. मात्र, यासाठीची 'रेकॉर्ड डेट' कंपनीने अजून जाहीर केलेली नाही.
शेअर्समध्ये ४०० टक्क्यांहून अधिक मोठी उसळी!
गेल्या काही वर्षांत या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी या शेअरची किंमत केवळ ८८.३० रुपये होती. ती आता १५ मे २०२६ रोजी वाढून ४४६.३० रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ४००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, ६ महिन्यांपूर्वी (१७ नोव्हेंबर २०२५) या शेअरची किंमत २४३ रुपये होती, जी आता ४४६.३० रुपये झाली आहे. म्हणजेच, अवघ्या ६ महिन्यांत हा शेअर ८०% वधारला.
रेव्हेन्यू २२१% ने वाढला
कोटयार्क इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये होत असलेल्या या जोरदार वाढीमागे कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी आहे. चौथ्या तिमाहीच्या (Q4) निकालात कंपनीच्या नफ्याने मोठी झेप घेतली आहे: मार्च २०२६ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीला ९.३८ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा केवळ १.५१ कोटी रुपये होता. तर, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर २२१% वाढून ६३.६६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनी नेमका काय व्यवसाय करते?
कोटयार्क इंडस्ट्रीज ही प्रामुख्याने बायोडीझेल उत्पादन आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात काम करते. कंपनी वापरलेले कुकिंग ऑईल, व्हेजिटेबल ऑईल आणि ॲनिमल फॅट्सपासून बायोडीझेल तयार करते. भविष्यातील ऊर्जेची गरज पाहता या क्षेत्राला मोठी मागणी आहे. कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिला तर, मार्च २०२६ च्या आकडेवारीनुसार, या कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा ६३.८४% आहे, तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांची भागीदारी ३६.१६% इतकी आहे.
(टीप: हा गुंतवणूकाचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
