Zepto IPO Sebi: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा टेक आणि स्टार्टअप कंपन्यांचे वारे वाहू लागले आहेत. क्विक कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी झेप्टोला (Zepto) आता सेबीनं (SEBI) आयपीओसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनी या माध्यमातून सुमारे ११,००० ते १२,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ४ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही कंपनी पब्लिक मार्केटमध्ये पाऊल ठेवणारी भारतातील सर्वात कमी वयाची स्टार्टअप कंपनी ठरू शकते.
झेप्टोची आयपीओकडे वाटचाल
बाजारात स्विगीच्या यशस्वी लिस्टिंगनंतर आता गुंतवणूकदारांच्या नजरा झेप्टोवर खिळल्या आहेत. को-फाउंडर आदित पालिचा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं झपाट्यानं प्रगती केली. आयपीओच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कंपनीनं आपलं नाव 'झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड' वरून बदलून 'झेप्टो लिमिटेड' असं केलंय. या इश्यूमध्ये अंदाजे ११,००० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल यांचा समावेश असू शकतो.
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
स्पर्धा आणि बाजारातील स्थान
क्विक कॉमर्स क्षेत्रात सध्या मोठी चढाओढ सुरू आहे. झेप्टोची थेट लढत ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्टशी आहे, तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनसारखे दिग्गजही स्पर्धेत उतरले आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनीनं ४५० मिलियन डॉलर्सचा निधी उभारला होता, ज्यामुळे कंपनीचं मूल्यांकन ७ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं. रणनितीचा भाग म्हणून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने अनेक शहरांमध्ये प्लॅटफॉर्म फी रद्द केली आणि मोठे डिस्काउंट दिले होते. आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षाच्या अखेरीस झेप्टोकडे ७,००० कोटी रुपयांची रोकड होती, जी ब्लिंकिट आणि स्विगीसारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सध्या कमी आहे.
सिंगापूरहून मायदेशी परतण्याचा निर्णय
झेप्टोने आपली नोंदणी (डोमिसाइल) सिंगापूरहून पुन्हा भारतात हलवली आहे. भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी अनेक स्टार्टअप्सनी हा मार्ग स्वीकारलाय. यावरून भारतीय बाजारपेठ आता टेक कंपन्यांसाठी मुख्य आकर्षण ठरत असल्याच स्पष्ट होतंय. या मेगा आयपीओसाठी मॉर्गन स्टेनली, ॲक्सिस कॅपिटल आणि गोल्डमन सॅक्स यांसारख्या मोठ्या बँकांची मदत घेतली जात आहे.
२०२६ मध्ये टेक आयपीओची लाट?
अंदाजानुसार, झेप्टोचं लिस्टिंग जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत होऊ शकतं. हा स्विगीनंतरचा सर्वात मोठा इंटरनेट आयपीओ मानला जात आहे. झेप्टो पाठोपाठ फोनपे, फ्लिपकार्ट, शॅडोफॅक्स आणि शिप्रॉकेट यांसारख्या कंपन्या देखील आयपीओच्या तयारीत आहेत, ज्यामुळे स्टार्टअप लिस्टिंगचा नवा काळ सुरू होऊ शकतो.
सेबीनं केवळ झेप्टोलाच नव्हे, तर धूत ट्रान्समिशन, होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स, सर्जिव्हिअर, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन आणि हॉटेल पोलो टावर या कंपन्यांनाही आयपीओसाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये संस्थागत गुंतवणूकदारांचा कल क्रिस्टल क्रॉप आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सकडे अधिक राहण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
