Airtel Q4 Results: देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी Bharti Airtel ने १३ मे रोजी मार्च २०२६ च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा ३४ टक्क्यांनी घटलेला दिसत असला, तरी कंपनीने आपल्या भागधारकांसाठी २४ रुपये प्रति शेअर इतका बंपर लाभांश जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.
वाढलेले रिचार्ज दर आणि 5G ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे कंपनीचा मूळ व्यवसाय अत्यंत मजबूत स्थितीत असल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे.
नफ्यात घट की केवळ तांत्रिक बदल?
आकडेवारीनुसार, मार्च २०२६ च्या तिमाहीत एअरटेलचा एकत्रित निव्वळ नफा ७,३२५ कोटी रुपये राहिला आहे, जो गेल्या वर्षी याच काळात ११,०२१ कोटी रुपये होता. नफ्यातील ही घट प्रामुख्याने 'बेस इफेक्ट'मुळे आहे. गेल्या वर्षी कंपनीला सुमारे २,८९२ कोटी रुपयांचा मोठा टॅक्स बेनिफिट मिळाला होता, ज्यामुळे तो आकडा फुगलेला दिसत होता. मात्र, करपूर्व नफ्याचा विचार केल्यास त्यात ३६ टक्क्यांची मोठी वाढ होऊन तो १३,२०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
महागड्या रिचार्जचा कंपनीला मोठा फायदा
टेलिकॉम क्षेत्रातील प्रगतीचे मुख्य लक्षण असलेल्या 'एव्हरेज रेव्हेन्यू पर युजर' मध्ये एअरटेलने बाजी मारली आहे. कंपनीचा एकूण महसूल १६ टक्क्यांनी वाढून ५५,३८३ कोटी रुपये झाला आहे. तर, प्रति ग्राहक सरासरी कमाई २५७ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. याशिवाय, या तिमाहीत कंपनीने ५८ लाख नवीन स्मार्टफोन वापरकर्ते आणि ८ लाख पोस्टपेड ग्राहक जोडले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, ग्राहकांनी महागड्या प्लॅन्सची निवड केल्यामुळे कंपनीच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.
गुंतवणूकदारांना २४ रुपयांचा लाभांश
नफ्यातील तांत्रिक घटीची चिंता गुंतवणूकदारांना सतावू नये, यासाठी बोर्डाने मोठ्या लाभांशाची घोषणा केली आहे. पूर्ण भरणा झालेल्या शेअर्सवर प्रति शेअर २४ रुपये लाभांश दिला जाणार आहे, तर अंशतः भरणा झालेल्या शेअर्सवर प्रति शेअर ६ रुपये लाभांश मिळेल. कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत याला मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत ही रक्कम गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होईल.
६५ कोटी ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा
एअरटेलने या आर्थिक वर्षात ६५ कोटी (६५० मिलियन) ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन गोपाल विट्टल यांच्या मते, एअरटेल आता केवळ इंटरनेट आणि कॉलिंगपुरती मर्यादित राहिलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर कंपनी आता 'लेंडिंग बिझनेस' (कर्ज देण्याचा व्यवसाय) मध्येही उतरत आहे. तसेच डेटा सेंटर नेटवर्कचा विस्तार आणि आफ्रिकेतील व्यवसायातील प्रगतीमुळे कंपनीची जागतिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)
