Akash Ambani:रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल शाखा असलेल्या 'जिओ प्लॅटफॉर्म्स'ने आपल्या बहुप्रतीक्षित IPO पूर्वी नेतृत्वात मोठा बदल केला आहे. रिलायन्स समूहाचे वारसदार आकाश अंबानी यांची पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर (MD) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती ९ एप्रिल २०२६ पासून प्रभावी होणार असून, ७ मे रोजी करण्यात आलेल्या नियामक फायलिंगमध्ये या बदलाची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. जिओचा आयपीओ येत्या काळात बाजारात धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
अनेक वर्षांचा अनुभव अन् वाढती जबाबदारी
मुकेश अंबानी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आकाश अंबानी गेल्या एका दशकापासून रिलायन्स समूहाच्या डिजिटल महत्त्वाकांक्षेचा चेहरा राहिले आहेत. त्यांचा २०१४ साली रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि.च्या बोर्डात समावेश करण्यात आला, तर २०२२ मध्ये रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी बढती मिळाली. त्यानंतर आता त्यांना जिओ प्लॅटफॉर्म्सचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नवी जबाबदारी मिळाली आहे.
जिओचा आयपीओ कधी येणार?
बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्स मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून २०२४ मध्ये Sebi कडे कागदपत्रे जमा करण्याची शक्यता आहे. 'द इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या या शेअर विक्रीमध्ये केवळ नवीन शेअर्स बाजारात आणले जातील. यामध्ये विद्यमान भागधारकांकडून शेअर्सची विक्री, म्हणजेच 'ऑफर फॉर सेल'चा समावेश नसेल.
