लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरातील मंदिरे आणि धार्मिक संस्थांकडे असलेले सोने केंद्र सरकार विकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने मंगळवारी या सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम दिला आहे. मंदिरांमधील सोने विकण्याचा किंवा त्याबाबत कोणतीही योजना आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकारने हे वृत्त पूर्णत: फेटाळून लावले आहे. काही पोस्टमध्ये केंद्र सरकार मंदिरांचे सोने घेणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
अफवांवर विश्वास ठेवू नका : सरकारचे आवाहन
कोणत्याही माहितीवर नागरिकांनी थेट विश्वास ठेवू नये आणि ती फॉरवर्ड करू नये. "अशा अफवांमुळे समाजात विनाकारण संभ्रम निर्माण होतो. कोणत्याही अधिकृत योजनांची माहिती केवळ सरकारी प्रसिद्धीपत्रके, अधिकृत संकेतस्थळे आणि पडताळणी केलेल्या माध्यमांद्वारेच दिली जाते," असे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकार काय म्हणते?
केंद्र सरकारने म्हटले आहे की, असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. मंदिर विश्वस्त संस्था किंवा कोणत्याही धार्मिक संस्थेचे सोने विकण्याची योजना आणण्यासंबंधीचे दावे पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन आहेत.
पोस्टमध्ये काय होता दावा?
केंद्र सरकार मंदिरांचे सोने घेऊन त्याबदल्यात 'गोल्ड बॉण्ड्स' जारी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात होता. इतकेच नव्हे तर, मंदिरांचे कळस, दरवाजे आणि इतर संरचनांवर असलेले सोन्याचे थर 'भारताचे धोरणात्मक सुवर्ण साठे' म्हणून घोषित केले जाणार असल्याच्या वावड्याही उठवल्या जात होत्या.
