Stock Market Highlights : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि ऑटो व मीडिया क्षेत्रातील खरेदीच्या जोरावर दोन्ही प्रमुख निर्देशांक वधारले. व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजारचानिर्देशांक सेन्सेक्स २०८.१७ अंकांनी वधारून ८४,२७३.९२ च्या पातळीवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी ६७.८५ अंकांनी वधारून २५,९३५.१५ वर स्थिरावला.
सेक्टोरल इंडेक्समध्ये चमक
आजच्या व्यवहारात 'मीडिया इंडेक्स'ने २ टक्क्यांची मोठी झेप घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. ऑटो इंडेक्समध्येही १ टक्क्यांची मजबुती दिसून आली. मध्यम आणि लहान कंपन्यांच्या शेअर्समध्येही खरेदीचा ओघ कायम होता, ज्यामुळे निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स
नफ्यातील प्रमुख शेअर्स
इटरनल
टाटा स्टील
बजाज ऑटो
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन
महिंद्रा अँड महिंद्रा
तोट्यातील प्रमुख शेअर्स
श्रीराम फायनान्स
एचसीएल टेक
डॉ. रेड्डीज लॅब्स
बजाज फायनान्स
टाटा कंझ्युमर
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला
जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा भारतीय रुपयाला झाला. मंगळवारी रुपया १८ पैशांनी मजबूत होत ९०.५८ प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला. सोमवारी रुपया ९०.७६ वर स्थिरावला होता. रुपयातील ही वाढ परदेशी गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे असल्याचे मानले जात आहे.
वाचा - सामान्यांचं वार्षिक पॅकेज अन् सोनू सूदच्या एका महिन्याचं भाडं सारखंच! HDFC बँकेसोबत झाला मोठा करार
आशियाई बाजारात 'जपानी' लाट!
जपानमध्ये पंतप्रधान साने ताकाची यांच्या ऐतिहासिक निवडणूक विजयानंतर आशियाई बाजारपेठांमध्ये तेजीचे वारे वाहू लागले आहेत.
- जपान : निक्केई २२५ इंडेक्स १.५२ टक्क्यांनी वधारून ५७,००० च्या विक्रमी पातळीवर पोहोचला.
- दक्षिण कोरिया : कोस्पी इंडेक्स १.२१ टक्क्यांच्या वाढीसह आपल्या उच्चांकाजवळ पोहोचला.
- हाँगकाँग : हँग सेंग इंडेक्स फ्युचर्समध्येही मोठी वाढ पाहायला मिळाली.
