LPG Gas Cylinder : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि प्रमुख तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. देशात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्टीकरण पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहे.
पुरवठा साखळी सुरक्षित : OMC चे आश्वासन
'इंडियन ऑईल', 'भारत पेट्रोलियम' आणि 'हिंदुस्तान पेट्रोलियम' या तिन्ही प्रमुख तेल विपणन कंपन्यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. "देशभरात गॅस सिलिंडरचा पुरवठा कायम राखण्यासाठी आमची यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. जागतिक स्तरावर काही अडचणी असल्या तरी भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे," असे कंपन्यांनी म्हटले आहे.
ग्राहकांना विशेष सूचना
तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची नियमावली जारी केली आहे.
घाईघाईत बुकिंग नको : गरज नसताना किंवा भीतीने आगाऊ बुकिंग करू नका. यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण येतो आणि ज्यांना खरोखर तातडीची गरज आहे, त्यांना सिलिंडर मिळण्यास उशीर होऊ शकतो.
एजन्सीवर गर्दी करू नका : गॅस वितरकांची यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सी किंवा डिस्ट्रीब्यूटरच्या कार्यालयात गर्दी करण्याची गरज नाही.
घरपोच सेवा सुरू : गॅस सिलिंडरची डिलिव्हरी नेहमीप्रमाणे घरपोच केली जाईल. कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत.
घरबसल्या बुकिंगसाठी उपलब्ध पर्याय
- डिजिटल युगात गॅस बुकिंग करणे आता अत्यंत सोपे झाले आहे. ग्राहकांसाठी खालील सुविधा उपलब्ध आहेत.
- IVRS/SMS : नोंदणीकृत मोबाईलवरून कॉल किंवा एसएमएस करून.
- मोबाईल ॲप: संबंधित कंपनीच्या अधिकृत ॲपद्वारे.
- मिस्ड कॉल: कंपन्यांनी दिलेल्या विशेष क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन.
- डिजिटल पेमेंट: ऑनलाईन पेमेंट करून घरबसल्या बुकिंग आणि पेमेंटची सुविधा.
वाचा - गुंतवणूकदारांची चांदी! सोन्याच्या किमतीत ३ हजार तर चांदीतही मोठी घसरण; खरेदीसाठी योग्य वेळ?
सरकारचा कडक इशारा
काही ठिकाणी टंचाईच्या अफवा पसरवून सिलिंडरची साठेबाजी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. तसेच, साठेबाजी करणाऱ्यांवर किंवा जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
